लोहमार्ग पोलिसांना राखी बांधत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने स्तुत्य उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त रेल्वे स्टेशन येथील सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना औक्षण करून राखी बांधण्यात आली.कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर असलेल्या पोलिसांप्रती आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. प्रतिष्ठानच्या या अनोख्या उपक्रमाचे यंदाचे हे नववे वर्ष आहे.
सोलापूरसह दौंड, कुर्डुवाडी, पुणे, लोणावळा, धाराशिव आणि लातूर आदी ठिकाणांहून आलेल्या लोहमार्ग पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठानच्या पदाधिकारी असलेल्या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानकडून दरवर्षी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यापूर्वी एसटी बसचे चालक-वाहक, पोस्टमन, रेल्वेचे टीसी, ट्रकचालक अशा विविध क्षेत्रांत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी, इनामदार, दत्तात्रय वाघमोडे, नंदकुमार राठोड, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांच्यासह मनुश्री कासट, शुभांगी लचके, अक्षता कासट, शिला तापडिया, रुपा कुत्ताते, प्रियंका जाधव, सुजाता सक्करगी, भारती जवळे आदी उपस्थित होते.
आमच्यासाठी भावनिक अविस्मरणीय क्षण : उपनिरीक्षक तांबोळी
यावेळी उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी म्हणाले, बहिणींनी वेळ काढून आमच्या पोलीस ठाण्यात येऊन राखी बांधली, हा आमच्यासाठी भावनिक आणि अविस्मरणीय क्षण आहे. हे प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. समाजाच्या सुरक्षेसाठी आमची कुठेही गरज भासल्यास आम्हाला नक्की बोलवा, असे आवाहन केले.
.png)
No comments:
Post a Comment