ढोक-बाभुळगावला मिळाला नवा युवा कीर्तनकार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

ढोक-बाभुळगावला मिळाला नवा युवा कीर्तनकार

 ढोक-बाभुळगावला मिळाला नवा युवा कीर्तनकार


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ढोक-बाभुळगाव (ता. मोहोळ) येथे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावाला युवा कीर्तनकार लाभला आहे. ह.भ.प. आदर्श गायकवाड महाराज यांनी गावात आपल्या घरच्या घरी पहिले कीर्तन सादर करून वारकरी संप्रदायातील आपल्या पुढील कार्याची सुरुवात केली. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.

ह.भ.प. आदर्श गायकवाड यांनी दातपूर येथील ज्ञानोबाराया वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले आहे. गरीब शेतकरी कुटुंबातील बालाजी गायकवाड यांचे ते सुपुत्र आहेत. गावाला स्वतःचा कीर्तनकार असावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. ती इच्छा आदर्श गायकवाड यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे.

लहानपणापासूनच आदर्श यांना वाचनाची आवड असून, सुरज वाचनालयातून त्यांनी विविध धार्मिक व आध्यात्मिक पुस्तके वाचली आहेत. वारकरी शिक्षणासोबतच धार्मिक साहित्याच्या वाचनामुळे त्यांच्या कीर्तनाला अभ्यासाची जोड मिळाली आहे.

त्यांच्या पहिल्या कीर्तनाला ढोक-बाभुळगाव परिसरातील असंख्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. बाल कीर्तनकाराचे कीर्तन ऐकून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. युवा पिढीमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या कमी होत असताना आदर्श गायकवाड यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

‘लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे आदर्श गायकवाड यांच्या बालवयापासूनच दिसून आलेली धार्मिक साहित्याची आवड आणि कीर्तनाची गोडी त्यांच्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट करणारी ठरत आहे. ढोक-बाभुळगावला मिळालेल्या या युवा कीर्तनकाराकडून वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages