महालक्ष्मी देवीची त्रिवार्षिक यात्रा १२ ऑगस्टला; १ हजार सुवासिनींची जलकुंभ मिरवणूक
३० हजार भाविकांसाठी महाप्रसाद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिव्हील हॉस्पिटल परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिराची त्रिवार्षिक आषाढ यात्रा बुधवार, १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. यानिमित्त मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभापासून १ हजार सुवासिनींची जलकुंभासह मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट व सोलापूर शहर वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिरवणूक बलिदान चौक, मंगळवार पेठ पोलीस चौकी, माणिक चौक, दत्त चौक, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा, जिल्हा परिषद, गुरुभेट, रंगभवनमार्गे सिव्हील हॉस्पिटल परिसरातील महालक्ष्मी मंदिरापर्यंत जाणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पावसासाठी महालक्ष्मी मातेला साकडे घालण्यात येणार आहे.यात्रेच्या दिवशी पहाटे ५ वाजता केशव झिपरे यांच्या हस्ते महालक्ष्मी मातेला पंचामृत अभिषेक होईल. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत मंदिरालगतच्या शामियान्यात सुमारे ३० हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गवळी समाजाच्या पारंपरिक श्रद्धेचा भाग म्हणून वाद्यांच्या निनादात म्हशी पळविण्याचा कार्यक्रमही होणार आहे.
यात्रेनिमित्त वृक्षारोपण तसेच शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजबांधवांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
शहर व जिल्ह्यातील भाविकांनी यात्रेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने अनिल गवळी यांनी केले.
यात्रा यशस्वी करण्यासाठी देवबा डोईजोडे, अनिल संभाजी गवळी, केशव झिपरे, प्रभाकर जानगवळी, पांडुरंग परळकर, वसंत पंगुडवाले, कृष्णात झिपरे, सुरेश जानगवळी, राजेश बहिरवाडे, शिवा भास्कर, दिलीप भास्कर, अशोक कलागते, देवा अंजीखाने, सुरेश कलागते, नागा खंडेराव, गोरख घुले, संजू शहापूरकर, टिनू अंजीखाने, महादेव बडवणे, योगेश झिपरे, प्रशांत झिपरे यांच्यासह समाजबांधव परिश्रम घेत आहेत.
या पत्रकार परिषदेस संभाजी झिपरे, पांडुरंग परळकर, प्रभाकर जानगवळी, ज्ञानेश्वर अंजीखाने, वसंत पंगुडवाले, केशव झिपरे, योगेश झिपरे आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment