एनडीडीबी’च्या मदतीने दूध संघ नफ्यात आणण्याचा प्रयत्न- चेअरमन रणजीतसिंह शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (एनडीडीबी) मदतीने तोट्यात असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाला नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
संघाची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी घेण्यात आली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत चेअरमन रणजीतसिंह शिंदे यांनी संघाचा लेखाजोखा सादर केला. ते म्हणाले की, विद्यमान संचालक मंडळ अस्तित्वात येऊन ५ वर्षांचा कालावधी झाला आहे. या संचालक मंडळाच्या कालावधीतील ही ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. गत अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या दूध संघाला फायद्यात आणण्याचा प्रयत्न संचालकांकडून करण्यात आला आहे.
पशुखाद्य कारखाना भाडेतत्त्वावर देऊन संघास प्रतिमहिना ८ लाख ५० रुपये हजार उत्पन्न सुरू केले. यापूर्वी हा कारखाना प्रतिमहिना कर्मचारी पगार, लाईट बिल, मशिनरी मेंटेनन्स व इतर खर्चाचा विचार करता प्रतिमहिना २० लाख रुपये लाईट बिल, कर्मचारी पगार १० लाख रुपये व मेंटेनन्स व इतर खर्च ५ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये तोट्यात होता.
पूर्वी संघाचे संकलन दैनंदिन १७ हजार लिटर होते. संचालक मंडळाच्या २०२३-२४ या कालावधीत दैनंदिन संकलन १ लाख २५ हजार लिटरपर्यंत होते. परंतु जुन्या मशिनरी व जादा कर्मचारी, दुरुस्ती खर्च जादा यामुळे प्रतिलिटर तोट्यात वाढ झाल्याने माहे ऑगस्ट २०२४ पासून संकलन बंद केल्याने प्रतिमहिना रु. २० लाख कर्मचारी खर्च अधिक लाईट बिल २० लाख रुपये प्रतिमहिना बचत झालेली आहे. त्यामुळे २०२४-२५ व २०२५-२६ या सालात संघाचा संचित तोटा रु. १० कोटीने कमी झालेला आहे.
सन २०२३-२४ ला संघाकडे बँकांची कर्जे ४२ कोटी १७ लाख रुपये इतकी होती. ती २०२५-२६ अखेर १ कोटी ४२ लाख रुपये इतकी आहेत. विद्यमान संचालक मंडळाने ३२ कोटी ७५ लाख इतक्या रकमेची बँक कर्जे परतफेड केलेली आहेत.
सन २०२३-२४ ला संघाकडे दूध उत्पादकांची देणी ५ कोटी २० लाख रुपये होती. ती २०२५-२६ अखेर निरंक आहे. विद्यमान संचालक मंडळाने दूध उत्पादकांची २०२५-२६ अखेर ५ कोटी २० लाख देणी अदा केलेली आहेत.
सन २०२४-२५ ला संघाकडे कर्मचाऱ्यांची पगार, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी इत्यादीची देणी रु. ८ कोटी १ लाख होती. ती २०२५-२६ अखेर २ कोटी ९० लाख देणी आहेत. विद्यमान संचालक मंडळाने कर्मचारी देणी ५ कोटी १८ लाख रुपये अदा केलेली आहेत.सन २०२३-२४ ला संघाची दूध संस्था व इतरांकडे रु. १९ कोटी ७१ लाख इतकी येणे बाकी होती. ती २०२५-२६ अखेर रु. १२ कोटी ५२ लाख आहेत. विद्यमान संचालक मंडळाने दूध संस्था व इतरांवर कोर्ट केसेस करून ७ कोटी १९ लाख रुपये येणे बाकी वसुली केलेली आहे.
सन २०२३-२४ साली कर्मचारी संख्या १६९ इतकी होती व पगारावरील खर्च ४ कोटी ६७ लाख रुपये वार्षिक इतका होता. सन २०२५-२६ साली कर्मचारी संख्या २९ असून पगारावरील खर्च १ कोटी ४० लाख रुपये आहे. सध्य:स्थितीत कार्यरत कर्मचारी २९ असून पगारावर खर्च वार्षिक ३६ लाख रुपये आहे. सन २०२३-२४ च्या तुलनेत संचालक मंडळाने ३ कोटी रुपये वार्षिक पगारावरील खर्च कर्मचारी कपात करून कमी केलेला आहे.
संघाचा मागील २०१७ पासूनचा सततचा तोटा कमी होऊन या वर्षी संघ नफ्यामध्ये आलेला आहे. विद्यमान संचालक मंडळ अस्तित्वात येताना संघास २०२२-२३ ला ९ कोटी ८२ लाख इतका तोटा होता. आज २०२५-२६ या सालात संघ नफ्यात आला, आहे, असे रणजीतसिंह शिंदे यांनी सांगितले.
चौकट-
सध्य:स्थितीत संघ ना नफा ना तोटा आहे
सन २०२३-२४ ला संघास वार्षिक इलेक्ट्रीक बिल १ कोटी ८४ लाख रुपये इतके होते. सन २०२५-२६ अखेर इलेक्ट्रीक बिल २ लाख ६१ हजार रुपये इतके आहे. विद्यमान संचालक मंडळाने शीतकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याने १ कोटी ८१ लाख रुपये इतकी इलेक्ट्रीक बिल खर्चात बचत झालेली आहे.सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संघास ३२ कोटी ४१ लाख रुपये इतका नफा दिसतो. हा नफा पंढरपूर व टेंभुर्णी येथील जागा विक्रीच्या व्यवहारातून झालेला आहे. हा नफा संचित तोट्यामध्ये सन २०२६-२७ ला वर्ग केला जाईल. त्यामुळे सध्य:स्थितीत संघ ना नफा ना तोटा असा आहे.

No comments:
Post a Comment