"हे गाव माझं, मी विकू देणार नाही"- जिल्हाधिकारी
तुळशी गावातील 'गाव विक्री'चा फलक हटवला
माढा (कटूसत्य वृत्त):- भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईला कंटाळून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावातील ग्रामस्थांनी थेट आपले 'गावच विक्रीला' काढल्याचा फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.
या आंदोलनाची गंभीर दखल घेत सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः तुळशी गावाला भेट दिली. ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधत "हे गाव माझ्या जिल्ह्यातील आहे, मी हे गाव कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नाही," असा विश्वास दिल्यानंतर ग्रामस्थांनी तो वादग्रस्त फलक हटवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तुळशी गावात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा भीषण प्रश्न भेडसावत आहे. वारंवार निवेदने देऊनही पाणीटंचाईचा प्रश्न सुटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर "हे गाव विक्रीला काढणे आहे" असा फलक लावला होता. या अनोख्या आंदोलनाची राज्यभरात मोठी चर्चा झाली आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
स्वतः पाठपुरावा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी तातडीने तुळशी गावात धाव घेतली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. "गावाला पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंत्रालयात प्रलंबित आहे. मी स्वतः या प्रस्तावाचा मंत्रालयात जाऊन तातडीने पाठपुरावा करेन आणि तुळशी गावाला कायमस्वरूपी पाणी मिळवून देईन," असा शब्द जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फलक काढला
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ग्रामपंचायतीसमोरील तो फलक सन्मानाने हटवण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी गावातील कोरड्या पडलेल्या विहिरी, शेती आणि पिकांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.

No comments:
Post a Comment