गो-कार्टसह एन. बी. नवले सिंहगडच्या ‘टीम वज्रा’ची राष्ट्रीय झेप! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 21, 2026

गो-कार्टसह एन. बी. नवले सिंहगडच्या ‘टीम वज्रा’ची राष्ट्रीय झेप!

 गो-कार्टसह एन. बी. नवले सिंहगडच्या ‘टीम वज्रा’ची राष्ट्रीय झेप!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील पहिली इलेक्ट्रिक गो-कार्ट तयार करून Best Acceleration बेस्ट ॲक्सेलेरेशन विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘टीम वज्रा'ने आता आणखी एक महत्त्वाची झेप घेतली आहे. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक आयसी इंजिन गो - कार्टसह हा संघ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज झाला असून, श्रावण महिन्याच्या प्रारंभी शहराचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिरात या गो-कार्टचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले.

गतवर्षी ‘टीम वज्रा’ने सोलापूर जिल्ह्यातील पहिली इलेक्ट्रिक गो-कार्ट विकसित करून अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. पुणे येथे झालेल्या स्पर्धेत संघाने आपल्या तांत्रिक कौशल्याची आणि वाहन चालविण्याच्या क्षमतेची छाप पाडत वेगवर्धन विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते. या यशानंतर अधिक आव्हानात्मक मोटर वाहन स्पर्धांसाठी संघाने यंदा अंतर्गत ज्वलन इंजिनावर आधारित गो-कार्ट विकसित केले आहे.

या गो-कार्टच्या निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांनी वाहन सांगाड्याची रचना, संगणकीय प्रारूप निर्मिती, निर्मिती व जोडणी, वाहनाची गतिशीलता, इंजिन व इतर यंत्रणांची सांगड आणि प्रत्यक्ष चाचणी अशा वाहन विकासाच्या विविध टप्प्यांवर प्रत्यक्ष काम केले आहे. केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता प्रत्यक्ष रचना, निर्मिती, चाचणी आणि कार्यक्षमतेत सुधारणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना या प्रकल्पातून मिळाला आहे.

१७ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील गो-कार्ट स्पर्धेत ‘टीम वज्रा’ सहभागी होत असून, देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांशी त्यांची स्पर्धा होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२६मध्ये कोयंबतूर येथे होणाऱ्या आणखी एका राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही हा संघ सहभागी होणार आहे.

इलेक्ट्रिक गो-कार्टपासून अंतर्गत ज्वलन इंजिनावर आधारित गो-कार्टपर्यंतचा ‘टीम वज्रा’चा प्रवास हा विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण नवकल्पना, व्यावहारिक अभियांत्रिकी ज्ञान आणि मोटर वाहन क्षेत्रातील वाढत्या योगदानाचे प्रतीक ठरत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना वाहन रचना, निर्मिती, गतिशीलता, चाचणी, इंजिन यंत्रणा आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे.

३० विद्यार्थ्यांची टीम; एकच ध्येय!
‘टीम वज्रा’मध्ये एकूण ३० विद्यार्थ्यांचा समावेश असून, टीम कॅप्टन प्रसन्ना साठे, उपकर्णधार सुमित तंबाके, उपकर्णधार अनिरुद्ध कामुर्ती, कोषाध्यक्ष यश विन्नू आणि व्यवस्थापक ऋषिकेश देगील यांच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल सुरू आहे. संघातील प्रमुख सदस्यांमध्ये पुष्कर उदगीरी, निखिल हब्बा, ज्ञानेश्वर पुजारी, प्रज्वल साबळे, सौम्य मादगुंडी, महिमा बासुतकर आणि नंदिनी शिंपाळे यांचा समावेश आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कॅम्पस संचालक संजय नवले आणि प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी ‘टीम वज्रा’चे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, सीआरटीएडचे संशोधन संचालक प्रा. एस. एच. पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी विकसित केलेली ही वेगवान झेप आता राष्ट्रीय स्पर्धेच्या मैदानात नवे यश मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages