विविधतेत एकतेचा संदेश देत एमआयटी व्हीजीएसमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एमआयटी व्हीजीएसमध्ये स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक मूल्ये आणि देशाप्रती कर्तव्याची भावना रुजविण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी मान्यवरांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि ध्वजगीताच्या सुमधुर स्वरांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध व जोशपूर्ण मार्चपास्टने उपस्थितांची मने जिंकली. संविधानाच्या मूल्यांची जाणीव दृढ करण्यासाठी याप्रसंगी प्रतिज्ञा तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून ‘विविधतेत एकता’ आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले मनमोहक नृत्य, समूहगीत आणि समूह नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "विविधतेत एकता जपणे, स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेणे आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांनी सक्रिय भूमिका बजावणे ही काळाची गरज आहे. देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करत उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे."
विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत
साजरा करण्यात आलेला स्वातंत्र्यदिन सर्वांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा ठरला.

No comments:
Post a Comment