आर्थिक व्यवहारात शिस्त महत्त्वाची मनोरमा परिवारातर्फे आ. राऊत यांचा सत्कार
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- सध्या सहकारी बँका आणि पतसंस्था चालविणे ही अत्यंत अवघड बाब झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने विविध नियम लागू केले जात असल्याने सहकार क्षेत्रासमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कर्जदारांनी स्वतःचे ६० टक्के भांडवल उभे करून ४० टक्के कर्ज घेतल्यास कर्जाची वेळेवर परतफेड करणे अधिक सुलभ होईल. आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त आणि काटकसर ठेवणे गरजेचे आहे, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
शनिवारी,मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँक आणि मनोरमा मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विधान परिषदेवर मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आमदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार राजन पाटील, आमदार अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.मल्टीस्टेटच्याअध्यक्ष शोभा मोरे यांनी स्वागत केले.
सत्काराला उत्तर देताना आमदार राऊत यांनी सहकार क्षेत्रासमोरील वाढत्या अडचणी, कर्जवितरणातील शिस्त, शेतीसाठी पाण्याची गरज व्यक्त करून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्धार केला.
कृष्णेचे पाणी आपल्या जिल्ह्यात आणण्याचे काम सुरू असून, या माध्यमातून शेती आणि उद्योगाला मोठी चालना मिळेल,” असे आमदार राऊत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासाला गती देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल तसेच इथेनॉल निर्मितीशी संबंधित धोरणांमुळे साखर उद्योगासमोर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोरमा परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत उद्योग आणि समाजाच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे.मनोरमा परिवाराचा लोकसंग्रह मोठा आहे. समाजाला दिशा देण्याचे काम या परिवाराने केले आहे. भविष्यातही अशीच मदत आणि सहकार्य त्यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चेतून प्रश्न सोडविले पाहिजेत. आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून विकासाला गती द्यावी असेही ते म्हणाले. माजी आमदार राजन पाटील यांनीही मनोरमा परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुमित मोरे यांनी आभार मानले.
.............................. .
चौकट...
काटकसरीनेच बँकिंग व्यवसायाला स्थैर्य - मोरे
कर्जदाराने घेतलेल्या कर्जाचा योग्य पद्धतीने विनियोग केल्यास त्यातून उत्तम प्रगती साधता येते. बँकिंग व्यवसायात काटकसर आणि आर्थिक शिस्तीला मोठे महत्त्व आहे.
“महाराष्ट्रातील अनेक बँका आर्थिक अडचणीत असून काही बँका तोट्यात जात आहेत. त्यामुळे बँकेचा खर्च हा झालेल्या नफ्यातूनच करण्याची शिस्त ठेवली पाहिजे. मनोरमा बँकेने सलग आठ वर्षे शून्य टक्के एनपीए राखला आहे,” असे बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment