आधुनिकीकरण करून साखरेचा दर्जा वाढवणार - जयसिंह मोहिते- पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- आधुनिकीकरण करून साखरेचा दर्जा वाढवणार असल्याचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहीते पाटील म्हणाले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी १९० कोटींचा आधुनिकीकरण प्रकल्प उभारण्यात येईल असे वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील,कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव माने देशमुख,कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील,सयाजीराजे मोहिते पाटील, प्रकाश पाटील, रावसाहेब मगर, नितीनराजे निंबाळकर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, सभासद, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, साखरेचा दर्जा उंचावण्यासाठी, सहकार महर्षी साखर कारखान्याच्या साखर उत्पादन विभागातील जुन्या यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.यासाठी १९० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येईल असे कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले.
यावेळी वार्षिक सभेसमोरील १३ विषय खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने मंजूर करण्यात आले. सदर विषयांचे वाचन कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी केले. तर यावेळी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या ऊस उत्पादकांचा व कारखान्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
*एफआरपीपेक्षा १७ वेळा अधिक ऊसदर दिला - स्वरूपारणी मोहिते पाटील*
यावेळी कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी, कारखान्याचा आढावा घेताना सांगितले, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने, जिल्ह्यात ११ वेळा सर्वाधिक ऊसदर दिला असून, १७ वेळा एफआरपीपेक्षा अधिक ऊसदर दिला आहे. त्यासाठी ऊस उत्पादकांना तब्बल ९०९ कोटी रुपये अतिरिक्त दिल्याचे त्यांनी सांगितले.
*केंद्र सरकार कडून,इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध घालण्याची शक्यता*
देशातील साखर उत्पादनात घट झाल्याने, केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घालण्याची शक्यता असल्याचे अध्यक्ष म्हणाले.शासनाने उसाची एफआरपी ११४ टक्क्यांनी वाढवली असली तरी साखरेची किमान विक्री किंमत ३१०० रुपयांच्या पुढे नेण्यात आलेली नाही.

No comments:
Post a Comment