पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार; तर पोलीस संरक्षणातही उद्योगपतीवर सत्तूरचा वार;
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर खा. शिंदेंचा संतप्त सवाल !
बारामती (कटूसत्य वृत्त):- राज्यात गोळीबाराच्या घटनांनी पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मुंबई येथील जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना व बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर धारदार सत्तूरने वार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. विशेष म्हणजे, सूर्यवंशी यांना राज्य शासनाकडून पोलीस संरक्षण देण्यात आले असतानाही हा हल्ला झाल्याने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणातील दोन अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा ते सात विशेष पथके तैनात केली आहेत.
वैयक्तिक कामासाठी आलेल्या राणा सूर्यवंशी यांच्याजवळ स्कूटीवरून दोन अज्ञात व्यक्ती सत्कार करावयाचा आहे म्हणून आल्या. त्यानंतर त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर धारदार सत्तूरने त्यांच्या उजव्या हातावर वार केला. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. हल्ल्यानंतर आरोपींनी पालखी महामार्गाच्या दिशेने पलायन केल्याची माहिती फिर्यादीकडून पोलिसांना देण्यात आली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस बंदोबस्त असतानाही हल्ला; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!
राणा सूर्यवंशी यांना राज्य शासनाकडून पोलीस संरक्षण देण्यात आले होते. घटनेच्या वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस वाहन सोबत होते, तर काही वाहने मागील अंतरावर होती. तरीही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केल्याने पोलीस संरक्षणाच्या प्रभावीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी तपास आणि पोलिसांच्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. मात्र, हल्ल्यामागील कारण आणि आरोपींची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
मुंबई येथे तर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर हाल्लेखोर येऊन गोळीबार करून जातात त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाच वचक राहिलेला नाही असे स्पष्ट दिसत असल्याचे जानकराकडून सांगितले जात आहे.
'राज्यात खरंच गृहमंत्री आहेत का?' प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
दरम्यान, राज्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनांवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना आणि बारामतीतील उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
'राज्यात रोज खुलेआम गोळीबार सुरू आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था अक्षरशः वाऱ्यावर आहे. राज्याला खरंच गृहमंत्री आहे का, हा प्रश्न आज जनतेला पडला आहे,' अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त असल्याचा आरोप करताना, राज्यातील गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे का, असा सवालही त्यांनी केला. जातीय आणि धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करण्याऐवजी जनतेच्या सुरक्षेसाठी सरकार नेमके काय करत आहे, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
'जनतेला सुरक्षा हवी आहे; सत्ता टिकवण्यासाठी संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून चालवलेला असंवैधानिक खेळ नको,' अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
आता पोलिसांसमोर मोठे आव्हान
पोलीस संरक्षण असतानाही उद्योगपतीवर झालेला हा हल्ला आणि राज्यातील इतर गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. हल्लेखोरांना तातडीने शोधून अटक करणे, हल्ल्यामागील कारण उघड करणे आणि अशा घटनांना आळा घालणे, हे आता पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. तपासातून या हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपींबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीसांचे हात आंदोलनातील मुलींच्या प्रायव्हेट पार्ट पर्यंत जाण्याऐवजी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यापर्यंत जायला पाहिजे अशी प्रतिक्रिया आंदोलनातील एका मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
.png)
No comments:
Post a Comment