पुनर्वसन सावरगाव (काळे) येथे उद्या पासून अखंड हरिनाम सप्ताह
भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व हरीकीर्तनाची पर्वणी; भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
कळंब (कटूसत्य वृत्त):- शहरातील पुनर्वसन सावरगाव (काळे) येथील जय हनुमान मंदिर परिसरात समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १८ ऑगस्ट ते सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
या सप्ताहात मंचर, पुणे येथील ह.भ.प. श्री शंकर महाराज शेवाळे यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होणार आहे. सप्ताहाच्या सातही दिवसांत विविध संतांच्या विचारांचे चिंतन, भागवत कथा, हरीपाठ, हरीकीर्तन तसेच हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ ऑगस्ट रोजी गंध महात्म्य व गोवर्धन आख्यान, दि. १९ रोजी आलमेध ब्राह्मणांची कथा, ध्रुवकथा व परीक्षिती जन्म, दि. २० रोजी प्रल्हाद चरित्र व नरसिंह अवतार, दि. २१ रोजी श्रीकृष्ण जन्म व बाललीला, दि. २२ रोजी गोवर्धन आख्यान, दि. २३ रोजी रुक्मिणी स्वयंवर कथा, तर दि. २४ रोजी श्रीकृष्ण सुदामा चरित्र व परीक्षिती मोक्ष या विषयांवर भागवत कथा होणार आहे.
यासोबतच सप्ताहात ह.भ.प. श्री नारायण महाराज उमरेश्वर पिंप्री, ह.भ.प. श्री हरिपंडित जाधव साळेगाव, ह.भ.प. श्री आण्णासाहेब महाराज बोथले, ह.भ.प. श्री शिवराज महाराज पवार शास्त्री, बुलडाणा, ह.भ.प. श्री महंत बोराडे महाराज शास्त्री, ह.भ.प. श्री पुंडलिक महाराज मोरे, देहू तसेच ह.भ.प. श्री धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांची हरीकीर्तने होणार आहेत.
सप्ताहादरम्यान कलशपूजन व गाथापूजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ऑगस्ट
सकाळी ८ते १० या वेळेत पालखी सोहळा संपन्न होणार आहे . सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ज्ञानसिंधू ह.भ.प.संदीपान महाराज हसेगावकर यांचे अमृतुल्य असे काल्याचे कीर्तन व महारूद्र अभिषेकानंतर महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे.याच दिवशी रात्री ९ वाजता मंदीरामध्ये बाराते वाडी व खुंटेफळ या गावाच्या वतिने भारूड चा ही कार्यक्रम होणार आहे.याचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ पुर्नवसन सावरगाव (काळे) यांच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment