बार असोसिएशनवर 'विधी संकल्प' पॅनलचे वर्चस्व
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर बार असोसिएशनच्या मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत 'विधी संकल्प' पॅनलने ६ पैकी ५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. उर्वरित एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. अध्यक्षपदी अॅड. संतोष पाटील, तर सचिवपदी अॅड. जयप्रकाश भंडारे यांची निवड झाली.
बार असोसिएशन सभागृहात सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. एकूण १,६८४ मतदारांपैकी १,४२८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ८५.३९ टक्के इतके उत्स्फूर्त मतदान झाले. मतदान व मतमोजणी शांततेत पार पडली.
निवडणुकीत 'विधी संकल्प' आणि 'विधी विकास' पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. तसेच काही अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात उतरून प्रमुख पदांसाठी जोरदार लढत दिली.
निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : अॅड. संतोष पाटील (७४७ मते) – विधी संकल्प (विजयी)
उपाध्यक्ष : अॅड. परमानंद जवळकोटे (१,०२९ मते) – विधी संकल्प (विजयी)
महिला उपाध्यक्ष : अॅड. शर्मिला देशमुख (८८४ मते) – विधी संकल्प (विजयी)
सचिव : अॅड. जयप्रकाश भंडारे (८०२ मते) – विधी संकल्प (विजयी)
खजिनदार : अॅड. सिद्धाराम पाटील (५६२ मते) – विधी संकल्प (विजयी)
सहसचिव : अॅड. प्रियंका गोरंटी (६८५ मते) – अपक्ष (विजयी)
अध्यक्षपदासाठी अॅड. राजेंद्र फताटे, अॅड. एस. आर. रेशमे आणि अॅड. मल्लिनाथ म्हमाणे यांनीही निवडणूक लढविली. सचिवपदासाठी मंजुनाथ कक्कमेळी, तर इतर पदांसाठी विविध पॅनल व अपक्ष उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच 'विधी संकल्प' पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. अखेर ही आघाडी कायम राखत पॅनलने पाच जागांवर विजय मिळवला, तर सहसचिवपदावर अपक्ष उमेदवार अॅड. प्रियंका गोरंटी यांनी बाजी मारली.
या निवडणुकीसाठी अॅड. बाबासाहेब जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना अॅड. रियाज शेख, अॅड. बसवराज हिंगमिरे आणि अॅड. मीरा प्रसाद यांनी सहकार्य केले.
.png)
No comments:
Post a Comment