सांगोला तालुक्यातील सात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

सांगोला तालुक्यातील सात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा

 सांगोला तालुक्यातील सात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा




सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यातील गाव, वाडी-वस्ती तसेच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या एकूण १४.५० किलोमीटर लांबीच्या सात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन त्यांचा ग्रामीण मार्ग योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्यांमध्ये मेथवडे फाटा ते मार्ग क्रमांक १६३ जोडणारा रस्ता (२ कि.मी.), संगेवाडी–मेथवडे रस्ता (२.६० कि.मी.), संगेवाडी–शेटफळ रस्ता (२ कि.मी.), तुळशीराम पवार-पाटील गणपत्ये वस्ती ते संगेवाडी–मेथवडे रस्ता (२ कि.मी.), वाटंबरे–अकोला रस्त्याला जोडणारा रस्ता (२.५० कि.मी.), मेडशिंगी–बुरलेवाडी रस्त्यापासून लेंडवे-चिंचोळे शिवारापर्यंतचा रस्ता (१.४० कि.मी.) तसेच एखतपूर गावठाण ते डी.एड. कॉलेज रस्ता (२ कि.मी.) यांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी, नागरिक आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील विकासाला गती देणारा हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे मानले जात आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण मार्गांची एकूण लांबी ६६५७.२३ किलोमीटरवरून ६६७९.७२ किलोमीटरपर्यंत वाढली असून, त्यात १४.५० किलोमीटरची भर पडली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, "सांगोला तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या सात रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळवून देण्यात यश आले. पुढील टप्प्यात या रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू राहतील."


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages