स्टोरी 'शिवराज्याभिषेक सोहळ्याची...' : 'The Kiran Mane Show' ला सोलापुरात हाऊसफुल्ल प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 7, 2026

स्टोरी 'शिवराज्याभिषेक सोहळ्याची...' : 'The Kiran Mane Show' ला सोलापुरात हाऊसफुल्ल प्रतिसाद

 स्टोरी 'शिवराज्याभिषेक सोहळ्याची...' : 'The Kiran Mane Show' ला सोलापुरात हाऊसफुल्ल प्रतिसाद

हुतात्मा स्मृती मंदिरच्या इतिहासात प्रथमच नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल; १५ ऑगस्टला दोन अतिरिक्त प्रयोगांची घोषणा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित 'स्टोरी शिवराज्याभिषेक सोहळ्याची... The Kiran Mane Show' या नाटकाला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे रंगलेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांची इतकी मोठी गर्दी झाली की संपूर्ण सभागृह हाऊसफुल्ल झाले. विशेष म्हणजे, हुतात्मा स्मृती मंदिरच्या स्थापनेपासून एखाद्या नाटकाचा प्रयोग पूर्ण क्षमतेने हाऊसफुल्ल झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे प्रेक्षकांनी सांगितले.

नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांनी विविध प्रसंगांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील ऐतिहासिक घटनाक्रम, त्यामागील संघर्ष, त्यावेळीच्या ब्राह्मणवादी ब्राह्मणांनी कश्या पद्धतीने त्रास दिला होता तेही या नाटकातून दाखवले, स्वराज्याची संकल्पना आणि इतिहासातील अनेक पैलू प्रभावी शैलीत मांडण्यात आल्याने प्रेक्षक भारावून गेले.

प्रयोगानंतर अभिनेते किरण माने यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत सोलापूरकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रेक्षकांचा वाढता उत्साह लक्षात घेता, १५ ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये या नाटकाचे दोन विशेष प्रयोग आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

नाटक पाहून बाहेर पडणाऱ्या अनेक प्रेक्षकांनी "आजपर्यंत ऐकलेल्या इतिहासापेक्षा वेगळे आणि अभ्यासपूर्ण संदर्भ या नाटकातून समजले", अशा भावना व्यक्त केल्या. इतिहासातील घटनांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या नाटकाने दिल्याचे मत अनेकांनी नोंदविले.

ऐतिहासिक विषय, प्रभावी मांडणी, दमदार अभिनय आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण यामुळे 'स्टोरी शिवराज्याभिषेक सोहळ्याची... The Kiran Mane Show' हे नाटक सोलापूरकरांच्या पसंतीस उतरले असून, १५ ऑगस्टच्या दोन प्रयोगांनाही मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages