"ऑनलाइन परीक्षा ही भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्यासाठीच..." - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 7, 2026

"ऑनलाइन परीक्षा ही भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्यासाठीच..."

 "ऑनलाइन परीक्षा ही भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्यासाठीच..."

स्पर्धा परीक्षार्थींचा भव्य मोर्चा!

राेहीत पवार, अभिजीत दिपके यांची उपस्थिती 




छ.संभाजीनगर (कटूसत्य वृत्त):- 'एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच हवी' या मुद्द्यावर शहरात युवाशक्ती एकवटलेली दिसली. 'एमपीएससी'सह पोलिस भरती, लघुलेखक आणि शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांनी दिल्ली गेट ते विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून सोडला.

हे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले. आंदोलनासाठी सकाळपासून शहरातील विविध भागांतून विद्यार्थी दिल्ली गेटजवळ जमा होत होते. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी व गैरप्रकार थांबवा, एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्या आणि पोलिस भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करा, अशा विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाला आमदार रोहित पवार, क्रॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके, विठ्ठल कांगणे, रविकांत तुपकर, नितेश कराळे, अमोल देशमुख, बाळासाहेब शिंदे, रविराज साबळे, दीपक केदार, अमोल गाडेकर, शिवराज मोरे, सागर साळुंके आणि अभिषेक शिंदे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, अन्य राज्यात आयोगामार्फंत होणाऱ्या भरती परीक्षा ऑनलाईन होतात, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात असे होत नाही. मात्र, सरकार खोटे बोलत आहे. राजकीय पातळीवर फोडाफोडी करुन सत्तेवर असलेल्या सरकारला विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्यायचे नाहीत. आम्ही मात्र यात सकारात्मक आहोत. शासकीय पातळीर राजकीय नेते जसे हा शब्द वापरतात तसा याचा अर्थ नाही, असे म्हणत गेल्या काही दिवसात झालेल्या पेपरफुटीचे उदाहरणे समोर ठेवली. तलाठी भरतीचा पेपर फुटला यात अभ्यास न करणारा मुलगा ' नॉर्मलायझेशन ' च्या निकषामुळे पुढे जात आहे. खरे तर अशा व्यवस्थेमुळे होणाऱ्या भरतीमध्ये भ्रष्टाचार करण्यास वाव निर्माण होतो असा आरोप आमदार राेहित पवार यांनी केला.

आयोगाकडून होणाऱ्या परीक्षांसाठी पुरेशा प्रमाणात संगणक नाहीत. एकाच पदासाठी अनेक वेळा परीक्षा होत असल्याने निकष ठरविणे अवघड होऊन गेले आहे. जर दहावी, बारावी, युपीएससीच्या परीक्षा नीट होतात तर मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑनलाईन का, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रश्नावर सरकारपर्यंत आवाज पोहचावा म्हणून पुणे येथे पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या आंदोलनात काही विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. लाकुडतोड्याच्या गोष्टीतील 'सोन्याची कुऱ्हाड आम्हाला नको, आम्हाला आमची लोखंडी कुऱ्हाडच द्या ' या शब्दात ' ऑफलाईन ' परीक्षेची मागणी करण्यात आली. या आंदोलनात रविराज साबळे, आशिष मगर, रविकांत तुपकर, बाबासाहेब शिंदे, शिवराज मोरे, प्रमोद पाटील, किरण निंभोरे यांचा सहभाग होता.

' आम्ही व्हायरस नाही, व्हॅक्सीन '

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जंतरमंतरवर आंदोलन करणााऱ्यांना आंतकवादी म्हटले. पण देशातील तरुणाई ही ' व्हायरस ' नाही ' व्हॅक्सीन ' आहे. उलट तुमच्यामुळे देशातील नीटची तयारी करणाऱ्या २० जणांनी आत्महत्या केल्या. पेपरफुटीमुळे अनेकांचे आयुष्य पणाला लागले. या स्थितीला तुम्हीच जबाबदार असल्याने तुम्हीच आंतकवादी आहात, असे कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके या वेळी म्हणाले. दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असणाऱ्या आंदोलनात सोनम वांगचूक हे गेल्या १६ दिवसापासून उपाेषण करत आहेत. दिल्लीतील आंदोलन धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही. या आंदोलनात मराठवाड्यातील तरुणांनी सहभाग द्यावा, असे आवाहन दिपके यांनी केले.

दिल्ली गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. 'हक्क आमचा, लढा भविष्याचा' अशा घोषणा देत आणि विविध मागण्यांचे फलक हाती घेत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार पवार, कांगणे, दिपके, कराळे यांच्यासह समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या भाषणांना उपस्थित तरुणांनी टाळ्या वाजवून दाद दिली. या आंदोलनात एमपीएससीसह पोलिस भरती, टीईटी आणि लघुलेखक पदांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप
विद्यार्थ्यांच्या या भव्य आंदोलनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय आणि सुभेदारी विश्रामगृह परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि दीड हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.

चौकट-

अशा आहेत प्रमुख मागण्या:

स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी 'एमपीएससी' आणि 'टीईटी'सारख्या महत्त्वाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात.

पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा तातडीने लागू करावा.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एक सक्षम व त्रयस्थ यंत्रणा कार्यान्वित करावी.

पोलिस भरतीचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे.

टीईटी परीक्षेची तारीख तातडीने घोषित करावी.

लघुलेखक पदे पुनरुज्जीवित करून त्यावरील भरती प्रक्रिया सुरू करावी.

'गट ड' मधील पदभरतीचे केंद्रीकरण रद्द करून भरती प्रक्रिया कायमस्वरूपी व नियमितपणे राबवावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages