'आरक्षण वाचवा, संविधान वाचवा'च्या घोषणांनी शहर दणाणले; आनंदराज आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात सोमवारी सोलापूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भीमसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 'जय भीम', 'आरक्षण वाचवा, संविधान वाचवा', 'उपवर्गीकरण रद्द करा' अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन पक्षाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला विशेष बळ मिळाले. यावेळी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जालन्यातील रुक्मिणी लोंढे यांच्यासह अनेक राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.
सकाळी दहापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात आंदोलक जमा होऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. न्यायालयाच्या अभिप्रायाचा चुकीचा अर्थ लावून सरकार राजकीय हेतूने आरक्षण उपवर्गीकरणाचा मार्ग स्वीकारत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
अडीच ते तीन तास चाललेल्या या मोर्चाने आंबेडकर उद्यान ते जिल्हा परिषद पूनम गेट हा संपूर्ण मार्ग व्यापला. सोलापूर शहरासह माढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर, करमाळा, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांतून मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
मोर्चा जिल्हा परिषद पूनम गेट येथे पोहोचल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी कृती समितीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला असल्याचा आरोप केला. तसेच न्यायमूर्ती बदर अहवाल आणि संबंधित समितीच्या शिफारशी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय अनुसूचित जाती-जमाती उपयोजनेचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी वैधानिक कायदा करावा, एससी-एसटी शेतकऱ्यांच्या जमिनी मूळ वारसांच्या नावे परत कराव्यात, कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील अनुदानात वाढ करून अटी शिथिल कराव्यात, अशा विविध मागण्याही शासनाकडे करण्यात आल्या.
मोर्चादरम्यान संपूर्ण परिसर निळ्या झेंड्यांनी आणि संविधान बचावाच्या फलकांनी व्यापला होता. सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे चारचाकी वाहनातून उभे राहून मोर्चेकऱ्यांचे अभिवादन करत होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
यावेळी ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, जनार्दन शिंदे, अशोक जानराव, अॅड. संजीव सदाफुले, देवा उघडे, बबलू गायकवाड, राजा सोनकांबळे, अमित कांबळे, अतिश बनसोडे, श्याम क्षीरसागर, विनोद इंगळे, प्रवीण कांबळे, कुमार चन्ना, सुहास सावंत यांच्यासह आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.
सभेच्या शेवटी शासनाने अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कृती समितीच्या नेत्यांनी दिला.
No comments:
Post a Comment