वारकरीकेंद्रित नियोजनामुळे आषाढी वारी यशस्वी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्गदर्शनाची गोरे यांची स्तुती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

वारकरीकेंद्रित नियोजनामुळे आषाढी वारी यशस्वी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्गदर्शनाची गोरे यांची स्तुती

 वारकरीकेंद्रित नियोजनामुळे आषाढी वारी यशस्वी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्गदर्शनाची गोरे यांची स्तुती

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- यंदाची आषाढी वारी वारकरीकेंद्रित नियोजन, प्रभावी सुविधा आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट समन्वयामुळे अत्यंत यशस्वी ठरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे व तातडीने उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा देता आल्या, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

धाराशिव येथील कार्यक्रम आटोपून मुंबईकडे रवाना होताना सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना गोरे बोलत होते. यावेळी त्यांनी यंदाच्या वारीतील नियोजनाचा आढावा घेत प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

गोरे म्हणाले की, यंदाच्या वारीत वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, जर्मन हँगर, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, चरणसेवा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे लाखो वारकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय वारीचा आनंद घेता आला.

यंदा व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामान्य वारकऱ्यांना कमी वेळेत आणि सुलभ पद्धतीने श्री विठ्ठलाचे दर्शन घेता आले. दर्शन व्यवस्थेतील पारदर्शकता आणि शिस्तीमुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर चरणसेवा आणि आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आणि विविध यंत्रणांच्या समन्वयातून ही सेवा प्रभावीपणे देण्यात आल्याने पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपूरमध्ये वारीपूर्वी आणि वारीनंतर साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यापूर्वी वारीनंतर साथीच्या आजारांच्या भीतीमुळे अनेक नागरिक शहराबाहेर जात असत. मात्र यंदा प्रशासनाने व्यापक स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ ठेवण्यात यश मिळविले. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका कमी झाला असून नागरिकांमध्येही दिलासादायक वातावरण असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

वारीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस प्रशासन तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण आषाढी वारीवर सातत्याने लक्ष ठेवून प्रशासनाने मागणी केलेला निधी व आवश्यक सुविधा तातडीने मंजूर केल्या. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून यंदाची आषाढी वारी राज्यासाठी आदर्श ठरल्याचा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

चौकट : फडणवीस महाराष्ट्रातच राहतील; गोगावले यांच्या वक्तव्यावर गोरे यांचा पलटवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील भाजपच्या यशातून जनतेने त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, या मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, “कोण कुठे जाणार हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?” असा सवाल करत गोरे यांनी गोगावले यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages