शेतकऱ्यांना न्याय, कारखान्यांवर करडी नजर; प्रादेशिक साखर सहसंचालक किरण गायकवाड यांचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

शेतकऱ्यांना न्याय, कारखान्यांवर करडी नजर; प्रादेशिक साखर सहसंचालक किरण गायकवाड यांचा इशारा

 शेतकऱ्यांना न्याय, कारखान्यांवर करडी नजर; प्रादेशिक साखर सहसंचालक किरण गायकवाड यांचा इशारा

पदभार स्वीकारताच एफआरपी अंमलबजावणीवर भर, परवानाधारक कारखान्यांनाच ऊस देण्याचे आवाहन



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत मिळते की नाही, यावर प्रशासनाचे बारीक लक्ष राहील, असा स्पष्ट इशारा नवनियुक्त प्रादेशिक साखर सहसंचालक किरण गायकवाड यांनी दिला. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शेतकरीहिताला प्राधान्य देण्याची भूमिका जाहीर केली.

किरण गायकवाड यांची सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सोलापूर जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीनंतर त्यांची सहनिबंधक सहकारी संस्था तथा साखर सहसंचालक म्हणून अहिल्यानगर येथे नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी तेथे पदभार स्वीकारला नव्हता. अखेर सहकार विभागाचे उपसचिव नितीन गायकवाड यांनी नव्या आदेशाद्वारे त्यांची सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालकपदी नियुक्ती केली.

पदभार स्वीकारताच गायकवाड यांनी शेतकऱ्यांना परवानाधारक साखर कारखान्यांमध्येच ऊस गाळपासाठी देण्याचे आवाहन केले. तसेच एफआरपीबाबत कोणतीही तक्रार सहन केली जाणार नसून शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर हा राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकेकाळी ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आज उसाचे सर्वाधिक गाळप करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक बनला आहे. सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांचा विस्तृत कार्यभार प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे असल्याने किरण गायकवाड यांच्या कार्यपद्धतीकडे सहकार क्षेत्रासह शेतकरी वर्गाचेही लक्ष लागले आहे.

साखर उद्योगातील शिस्त, एफआरपीची काटेकोर अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण यावर भर देत गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात केल्याने साखर क्षेत्रात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages