पापरी शाळा मॉडेलचा कुरुल गटात विस्तार; प्रत्येक शाळा होणार डिजिटल
जि.प. सदस्य सचिन जाधव यांचा पापरी व खंडाळी डिजिटल शाळांना अभ्यास दौरा
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : मोहोळ तालुक्यातील राज्यभर नावारूपाला आलेल्या पापरी आणि खंडाळी (इंगोले वस्ती) येथील डिजिटल जिल्हा परिषद शाळांचा अभ्यास दौरा कुरुल जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन जाधव यांनी केला. या दोन्ही शाळांमध्ये राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, फेस रिडिंग प्रणाली, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीची त्यांनी सविस्तर माहिती शिक्षकांकडून जाणून घेतली.
या भेटीदरम्यान पापरी शाळेच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून कुरुल जिल्हा परिषद गटातील प्रत्येक शाळा आधुनिक, डिजिटल आणि गुणवत्तापूर्ण करण्याचा आपला संकल्प असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले. या धर्तीवर शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोहोळ तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषद शाळा ही आज राज्यातील आदर्श सरकारी शाळांपैकी एक म्हणून ओळखली जाते. शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे या शाळेला राज्यस्तरीय अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे या शाळेत प्रवेशासाठी पालकांची मोठी गर्दी होत असून सध्या सुमारे साडेनऊशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
खंडाळी येथील इंगोले वस्तीवरील डिजिटल शाळेनेही आधुनिक शिक्षणपद्धती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या शाळेतील शैक्षणिक नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेले शैक्षणिक वातावरण याचीही जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य गणेश मुळे, राजेंद्र शेळके, मुख्याध्यापक आबासाहेब टेकाळे, अजित भोसले, सोमनाथ व्यवहारे, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment