सोलापूरच्या जि.प. शाळेचा देशात डंका; शेळकेवाडी शाळेला फाईव्ह स्टार रेटिंग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 17, 2026

सोलापूरच्या जि.प. शाळेचा देशात डंका; शेळकेवाडी शाळेला फाईव्ह स्टार रेटिंग

 सोलापूरच्या जि.प. शाळेचा देशात डंका; शेळकेवाडी शाळेला फाईव्ह स्टार रेटिंग




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी (शिवणे) हिने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६’ स्पर्धेत ९०.८० गुणांसह फाईव्ह स्टार रेटिंग मिळवत देशात ६३वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळा ठरली आहे.
देशभरातील हजारो शाळांचे स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हात धुण्याच्या सुविधा, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा व जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, हरित परिसर, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शाश्वत विकास आदी निकषांवर बहुपदरी मूल्यमापन करण्यात आले. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कठोर छाननीनंतर देशातील केवळ १९१ उत्कृष्ट शाळांची राष्ट्रीय गौरवासाठी निवड करण्यात आली. यामध्ये शेळकेवाडी शाळेने ६३वे स्थान मिळवले.
महाराष्ट्रातून जिल्हा परिषद शाळांच्या गटात केवळ शेळकेवाडी शाळेने राष्ट्रीय स्तरावरील निवडीत स्थान मिळवत राज्याचा झेंडा उंचावला आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शाळेचे अभिनंदन केले. ग्रामीण शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा हा राष्ट्रीय सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अन्य शाळांनीही शेळकेवाडीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले. हे यश सामूहिक प्रयत्नांचे फलित असून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर सिद्ध करणारी कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनीही शाळेचे अभिनंदन करत, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे गौरवोद्गार काढले. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील दाद असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET-NCERT) यांनी अधिकृत पत्राद्वारे शाळेच्या राष्ट्रीय गौरवासाठी निवडीची माहिती दिली आहे. लवकरच होणाऱ्या राष्ट्रीय गौरव समारंभात शेळकेवाडी शाळेचा सन्मान करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळाही योग्य नियोजन, शिक्षकांची निष्ठा, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवू शकतात, याचा आदर्श शेळकेवाडी शाळेने देशासमोर ठेवला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages