आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीतही पाणी; शेतकरी आणि भाविकांना दिलासा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी उजनी धरणातून भीमा-सीना जोडकालव्यात (बोगदा) २०० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भीमा नदीतही पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर यांनी दिली.
अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी सांगितले की, सिंचनाची गरज लक्षात घेऊन भीमा-सीना जोडकालव्यातील पाण्याचा विसर्ग आवश्यकतेनुसार वाढविण्यात येणार आहे. यामुळे जोडकालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित शिंदे आणि आमदार अभिजित पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जोडकालव्यात सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भीमा नदीतही पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठावरील ऊसासह अन्य पिकांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती.
या मागणीला पाठिंबा देत खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता भीमा नदीत विसर्ग करण्यात येणार असून, जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत हे पाणी पोहोचविण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर यांनी स्पष्ट केले.
सिंचनासाठी आणि आषाढी वारीदरम्यान नदीपात्रात पाणी उपलब्ध राहण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी आणि भाविक या दोघांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

No comments:
Post a Comment