स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; एसटी प्रवाशांना मोठा दिलासा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; एसटी प्रवाशांना मोठा दिलासा

स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; एसटी प्रवाशांना मोठा दिलासा


 सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अर्थात स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याची मुदत १ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. अपेक्षित प्रमाणात नोंदणी पूर्ण न होणे तसेच कार्ड वितरण प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना मिळणारा मोफत प्रवास, तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणाऱ्या ५० टक्के प्रवास सवलतीसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले होते.

गेल्या काही महिन्यांत अनेक प्रवाशांनी ऑनलाइन तसेच एसटी बसस्थानकांवरील केंद्रांमधून नोंदणी केली. मात्र पुरवठा आणि तांत्रिक प्रक्रियेतील विलंबामुळे अनेकांना अद्याप कार्ड प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पात्र प्रवाशांना केवळ कार्ड उपलब्ध नसल्यामुळे सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी महामंडळाने मुदतवाढ जाहीर केली आहे.

महामंडळाच्या निर्णयानुसार, ज्यांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे परंतु कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांना १ सप्टेंबरपर्यंत जुने ओळखपत्र दाखवून सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी सर्व एसटी आगारांमध्ये विशेष कक्ष व मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून, अधिकाधिक प्रवाशांपर्यंत स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी वेळेत नोंदणी करून स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावे.

स्मार्ट कार्डबाबत महत्त्वाचे नियम
• स्मार्ट कार्डची नवीन अंतिम मुदत – १ सप्टेंबर २०२६
• अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सवलतीच्या प्रवासाकरिता बंधनकारक
• ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, ६५ वर्षांवरील नागरिक व महिलांना ५० टक्के सवलत
• नोंदणी केलेली असूनही कार्ड न मिळाल्यास १ सप्टेंबरपर्यंत जुने ओळखपत्र ग्राह्य
• अधिक माहितीसाठी जवळच्या एसटी आगारातील विशेष कक्षाशी संपर्क साधावा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages