चौकशीचा फार्स नको संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा - सुषमा अंधारे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 13, 2026

चौकशीचा फार्स नको संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा - सुषमा अंधारे

 चौकशीचा फार्स नको संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा - सुषमा अंधारे 

मोशी दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची सुषमा अंधारे यांनी घेतली भेट 




पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथे असलेल्या कचरा डेपोमध्ये बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी कचऱ्याचा डोंगर कोसळून येथील अनधिकृत इमारतीखाली चिरडून ९ कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविणाऱ्या अँटनी लारा या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सक्षम मदत द्यावी. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. 
   रविवारी (दि. १२ जुलै) चिंचवड येथे पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी शिवसेना शहर प्रमुख चेतन पवार व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी या घटनेत जखमी झालेल्या मृत कामगारांच्या कुटुंबीयांची सुषमा अंधारे यांनी भेट घेऊन सांत्वन केले आणि जखमी कामगारांना भेटून विचारपूस केली.
    मोशी येथे झालेली घटना निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहे. या संपूर्ण प्रकरणात पालिका आयुक्तांनी अधिकृतरित्या पत्रकार परिषद किंवा एखादे निवेदन सादर करून लोकांना माहिती देणे अपेक्षित होते, की घटनास्थळी एकूण किती लोक होते, त्यातून सुखरूप किती बाहेर काढले, किती जखमी आहेत, किती लोक मृत्युमुखी पडले, या इमारतीचे नेमके स्टेटस काय याची कशाचीही माहिती लोकांना दिली गेली नाही. या सगळ्या प्रकरणातून पालिका आयुक्तांनी पळ काढला आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांनी यावर बोलणे शिताफीने टाळले. 
   मोशी येथील या इमारतीचे फक्त तळमजल्याचे कम्प्लीएशन सर्टिफिकेट घेतले असताना दोन मजले विनापरवाना बांधले. त्या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. जे काही महिन्यातच पडले. ५ जून पर्यावरण दिनाच्या दिवशी या कंपनीची चिमणी पडली. बाजूला खदानीचे काम करताना ब्लास्ट मुळे कदाचित कचरा डेपो कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही हे माहीत असूनही येथे संरक्षित भिंत उभारायला हवी होती. तसेच येथे विषारी मिथेन वायू तयार होऊ शकतो तर यावर उपाय केला आहे का. आयुक्त आणि संजय कुलकर्णी यांच्याकडे यावर काही उत्तर नाही. 
    अगोदरच्या आयुक्तांनी पिंपरी चिंचवड मधील अनधिकृत बंगले आणि दुकानांवर कारवाई केली. परंतु पालिकेचे हे अनधिकृत बांधकाम हटवले नाही. येथे कामगारांचा जीव वाचवायला केवळ तीन - चार मशीनचा वापर करून महत्वाचा वेळ वाया घालवत अनेकांचा जीव टांगणीला लावला. आर्थिक सुबत्ता त्याच्या मागे यंत्रणा आणि गरिबांच्या मागे कोणीच नाही. पालिका आयुक्तांचे कोणाशी साटेलोटे होते का? या कंपनीत कोणते बायप्रॉडक्ट बनवले जातात, त्यांचा व्यवहार कुणासोबत असतो याबद्दल माहिती दिली नाही. 
     या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद अजून नाही. मृतांचे नातेवाईक सध्या ट्रॉमामध्ये असल्यामुळे ते पोलीस कम्प्लेंट करणार नाही. यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यायला हवा होता. यात लोक प्रतिनिधी गायब होते. ९ लोकांचा जीव गेला याचे त्यांना काहीही वैशम्य वाटत नाही. हा लोकप्रतिनिधी आणि माणुसकीचा मृत्यू आहे. अधिवेशन चालू असतानाही मुख्यमंत्र्यांनी याचा साधा उल्लेख केला नाही. 
    अँटनी लारा या कंपनीने मृत कामगारांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली परंतु हे यावर उत्तर असू शकत नाही. पालिका आयुक्त आणि प्रकल्पाधिकारी संजय कुलकर्णी यांच्यावर तत्काळ निलंबन कारवाई का झाली नाही. यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासंबंधीत कंपनी, आयुक्त सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी या सगळ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला. यासाठी सभागृहात, सभागृहाच्या बाहेर आणि न्यायालयीन लढा आम्ही लढत राहू असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages