नागणसूरच्या ऐतिहासिक श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन
१.६९ कोटींच्या विकासकामाला प्रारंभ; धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- नागणसूर येथील ग्रामदैवत आणि १२ व्या शतकातील ऐतिहासिक हेमाडपंती श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धारासह १ कोटी ६९ लाख रुपयांच्या सभामंडप बांधकामाचा शुभारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. या कामामुळे मंदिराचे ऐतिहासिक वैभव अधिक खुलणार असून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
भूमिपूजन सोहळ्यास श्री ष. ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, म. नि. प्र. अभिनव बसवलिंग महास्वामीजी, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाराम शिवमूर्ती, विकास बुळ्ळा, पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी, पंचायत समिती सदस्य वीरभद्र सलगरे, दुधनी बाजार समितीचे सभापती सातलिंगप्पा परमशेट्टी, उपसभापती सिद्धाराम बाके, सिद्धाराम तोळणुरे, सागर हिप्परगी, मैंदर्गी नगराध्यक्ष पती योगीनाथ बाजरमठ, नगरसेवक लक्ष्मीकांत धनशेट्टी, मल्लिकार्जुन भासगी, सिद्धलिंग कोनापुरे, संगय्या स्वामी, मल्लिकार्जुन ट्रस्टचे सदस्य, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बारगजे यांनी सांगितले की, मंदिराचे मूळ ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवत सभामंडपाचे बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी उपलब्ध करून दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण केले जाईल.
यावेळी म. नि. प्र. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी भारतीय संस्कृती आणि देवस्थानांचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले. कुंभमेळ्यात एका परदेशी भाविकाने भारतभूमीला मंदिरस्वरूप मानून अनवाणी फिरल्याचा अनुभव सांगत त्यांनी भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज मंटकी यांनी केले, तर आभार अप्पू गंगोंड यांनी मानले. सभामंडपाच्या भूमिपूजनामुळे ऐतिहासिक श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या संवर्धनाला नवी दिशा मिळणार असून धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले...
"प्रचारादरम्यान मी या मंदिराला भेट दिल्यानंतर त्याच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला होता. त्यानुसार १ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे मंदिर आपल्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे ऐतिहासिक आणि कलात्मक स्वरूप अबाधित ठेवूनच हे काम पूर्ण करण्यात येईल."
No comments:
Post a Comment