ई-२० पेट्रोलबाबत पंपांवर झळकले सूचना फलक; वाहनचालकांमध्ये संभ्रम कायम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

ई-२० पेट्रोलबाबत पंपांवर झळकले सूचना फलक; वाहनचालकांमध्ये संभ्रम कायम

 ई-२० पेट्रोलबाबत पंपांवर झळकले सूचना फलक; वाहनचालकांमध्ये संभ्रम कायम



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- देशभरात ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या वापराबाबत चर्चा सुरू असताना आता पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या माहितीसाठी विविध सूचना फलक झळकू लागले आहेत. सोलापूर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरही असे फलक लावण्यात आले असून, त्यामध्ये ई-२० इंधनाचे फायदे आणि वापरादरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, या परस्परविरोधी वाटणाऱ्या सूचनांमुळे वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.

तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, ई-२० इंधनामुळे वाहनांच्या इंजिनचे कोणतेही नुकसान होत नाही. तसेच वाहनाच्या विमा दाव्यावरही त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचा दावा फलकांवर करण्यात आला आहे. ई-१० च्या तुलनेत अधिक चांगले एक्सेलरेशन, कार्बन उत्सर्जनात ३० टक्क्यांपर्यंत घट आणि उच्च ऑक्टेन रेटिंगमुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

दुसरीकडे, काही पेट्रोल पंपांवर इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत खबरदारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्यास इथेनॉल वेगळे होऊन टाकीच्या तळाशी साचू शकते. त्यामुळे वाहन सुरू होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहनाच्या टाकीत पाणी जाणार नाही, याची काळजी ग्राहकांनीच घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच अशा परिस्थितीसाठी पेट्रोल पंप चालक जबाबदार राहणार नसल्याची सूचनाही फलकांवर देण्यात आली आहे.

एका बाजूला ई-२० इंधनाचे फायदे सांगितले जात असताना दुसऱ्या बाजूला खबरदारीच्या सूचना दिल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावरही ई-२० पेट्रोलबाबत विविध दावे-प्रतिदावे केले जात असल्याने सामान्य नागरिक नेमके कोणत्या माहितीवर विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

प्रतिक्रिया : काशिनाथ चनशेट्टी (वाहनधारक)

"सोशल मीडियावरून आम्ही ई-२० पेट्रोलबाबत वेगवेगळे व्हिडिओ पाहत आहोत. त्यामुळे आमच्यासारख्या वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही जण या पेट्रोलमुळे इंजिनवर परिणाम होतो, असे सांगतात, तर तेल कंपन्या ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करतात. नेमके सत्य काय, हे समजत नाही. शासनाने या विषयावर तज्ज्ञांकडून सविस्तर अभ्यास करून स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून वाहनधारकांच्या मनातील संभ्रम दूर होईल."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages