सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये बस चालक, लेडी अटेंडंटसाठी सुरक्षा जनजागृती मोहीम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही सर्वोच्च जबाबदारी मानत सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव येथे शालेय बस चालक व लेडी अटेंडंट यांच्यासाठी विशेष सुरक्षा जनजागृती व मार्गदर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे २५ ते ३० बस चालक व लेडी अटेंडंट यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, मपो केंद्र, पाकणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, प्राचार्या शाहीन शेख, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणताना व घरी सोडताना घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन, बस सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणे, सुरक्षितरीत्या चढ-उतार करणे, बसमध्ये कोणताही विद्यार्थी राहिलेला नसल्याची खात्री करणे, आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही तसेच महिला अटेंडंटची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी प्रेमळ, संयमी व जबाबदारीने वागण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत प्रत्येक बस चालक व लेडी अटेंडंट यांनी सतर्कता, शिस्त आणि जबाबदारीने कर्तव्य बजावावे, असे आवाहन केले. "सुरक्षित वाहतूक ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असून विद्यार्थ्यांचा विश्वास जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे," असे ते म्हणाले.
प्राचार्या शाहीन शेख यांनी संस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले. अशा जनजागृती उपक्रमांमुळे चालक व लेडी अटेंडंट यांच्यात सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. शेवटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, शिस्तबद्ध व जबाबदार वाहतुकीसाठी सर्वांनी सामूहिकरीत्या कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सुरक्षा जनजागृती मोहिमेचे उपस्थितांनी स्वागत केले.
.png)
No comments:
Post a Comment