ॲट्रॉसिटी कायद्यातील दोषसिद्धी वाढविण्याचे निर्देश स्वागतार्ह-डॉ.हुलगेश चलवादी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

ॲट्रॉसिटी कायद्यातील दोषसिद्धी वाढविण्याचे निर्देश स्वागतार्ह-डॉ.हुलगेश चलवादी

 ॲट्रॉसिटी कायद्यातील दोषसिद्धी वाढविण्याचे निर्देश स्वागतार्ह-डॉ.हुलगेश चलवादी       

आरपीआय पीडितांच्या सदैव पाठीशी

 



 पुणे (कटूसत्य वृत्त):- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे, जलदगती न्यायालयांची उभारणी, तपास प्रक्रियेत सुधारणा तसेच साक्षीदार संरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी स्वागत केले आहे. मा.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात आरपीआय पीडितांच्या मागे सदैव खंबीरपणे उभी असल्याचे देखील डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.

ॲट्रॉसिटी कायद्याचा मूळ उद्देश अनुसूचित जाती व जमातीवरील अत्याचारांना आळा घालणे आणि पीडितांना तातडीने न्याय मिळवून देणे हा आहे. दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी वकिलांचे प्रभावी कामकाज, तपास अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण, साक्षीदार संरक्षण व्यवस्था आणि जलदगती न्यायालयांची उभारणी यांसारखे निर्णय न्यायव्यवस्था तसेच राज्य व्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ करतील, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.

राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे, तेथील परिस्थितीचा सखोल अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अशा ठिकाणी सामाजिक न्याय बाधित होणार नाही आणि मूलभूत अधिकारांचे हनन होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. राज्याच्या प्रमुखाने दिलेले निर्देश सर्वसामान्यांसह पीडितांमध्ये विश्वास निर्माण करणारा असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस, प्रशासन, सरकारी वकील आणि संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ॲट्रॉसिटी कायद्याची कठोर आणि पारदर्शक अंमलबजावणी ही सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि वंचित घटकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर घेतलेली भूमिका आणि दिलेले निर्देश हे पीडितांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक पाऊल असून, त्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages