वाखरी येथे ७ दिवसांत सर्व्हिस रोड पूर्ण करा- खा प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 9, 2026

वाखरी येथे ७ दिवसांत सर्व्हिस रोड पूर्ण करा- खा प्रणिती शिंदे

वाखरी येथे ७ दिवसांत सर्व्हिस रोड पूर्ण करा- खा प्रणिती शिंदे



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी २०२६ च्या परतीच्या प्रवासादरम्यान वारकऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहावी तसेच शतकानुशतके सुरू असलेली वाखरी येथील पालखी मुक्कामाची परंपरा कायम राखली जावी, यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्यक्ष वाखरी येथील परतीच्या प्रवासातील पालखी मुक्काम स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) पंढरपूर येथील प्रकल्प अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करून सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रकल्प संचालकांना निवेदन देऊन वाखरी (ता. पंढरपूर) येथे सर्व्हिस रोडचे काम युद्धपातळीवर मंजूर करून अवघ्या सात दिवसांत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, आषाढी वारीदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध पालख्यांचा मुक्काम व रिंगण सोहळे वाखरी येथे पार पडतात. आषाढी एकादशी व पौर्णिमेनंतर परतीच्या प्रवासातही पालख्यांचा पहिला मुक्काम वाखरी येथे होत असून ही अनेक वर्षांची पवित्र व ऐतिहासिक परंपरा आहे.

मात्र, वाखरी परिसरात सुरू असलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे गावाकडे जाणारा मूळ रस्ता बंद झाला असून गावात प्रवेश करण्यासाठी किंवा पालख्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेला सर्व्हिस रोड अद्याप तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे वारकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सर्व्हिस रोड नसल्यामुळे पालख्या, दिंड्या आणि लाखो वारकऱ्यांना गावात व पालखी तळावर पोहोचणे अत्यंत कठीण होणार असून त्यामुळे परतीच्या पहिल्या मुक्कामाची परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वारकरी, भाविक आणि पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी दूरध्वनीवरील चर्चेदरम्यानही खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता अधोरेखित करत, परतीच्या वारीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर आषाढी वारी २०२६ च्या परतीच्या प्रवासापूर्वी वाखरी येथे सर्व्हिस रोडचे काम तातडीने मंजूर करून युद्धपातळीवर अवघ्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

यावेळी उपसरपंच संग्राम गायकवाड, माजी सरपंच नवनाथ मदने, गंगाधर भाऊ गायकवाड, सुभाष सुरवसे, बाळासाहेब लेंगरे, दत्ता जगताप, पोपट गायकवाड, शिवाजी गाजरे, प्रकाश शिंदे आकाश आवताडे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages