सोलापूर जिल्ह्यात पावसाची संथ सुरुवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात चालू मॉन्सून हंगामात पावसाची सुरुवात अत्यंत संथ गतीने झाली असून, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यातील काही मोजकी मंडळे वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी असून, एकूण सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी (ता. 5) दिवसभर कधी ऊन, कधी ढगाळ तर कधी काही भागात हलक्या पावसाच्या सरी असे चित्र होते
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, बार्शी आणि करमाळा तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. बार्शी तालुक्यातील वैराग आणि उपाळे दुमाले या मंडलांमध्ये इतर भागांच्या तुलनेत थोडा चांगला पाऊस झाला आहे. उपाळे दुमाले येथे सर्वाधिक २६.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, वैरागमध्ये १५.६ मिमी पाऊस पडला आहे. करमाळा तालुक्यातील अंजनगाव मंडळात २३.४ मिमी, तर जेऊर मंडलात २२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे, सांगोला आणि माळशिरस या दुष्काळी पट्ट्यात पावसाने पुन्हा एकदा ओढ दिली आहे. सांगोला तालुक्यातील सावे (७.० मिमी), जवळा (३.६ मिमी) आणि हटकर मंगेवाडी (१०.१ मिमी) या मंडलांमध्ये अतिशय कमी पाऊस झाला असून, सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी चिंताजनक आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक मंडलांमध्ये तर पावसाची केवळ हजेरीच पाहायला मिळाली आहे.
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यातील अनेक मंडलांमध्ये पावसाची नोंद शून्य (0.0 मिमी) किंवा १ ते २ मिमी इतकीच अत्यंत नगण्य आहे. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, वागदरी आणि चपळगाव मंडलांमध्ये अद्याप खातेही उघडलेले नाही.
खरीप पेरण्या खोळंबल्या
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाचे दिवस केवळ १ ते २ दिवस किंवा शून्य दाखवत असल्याने जमिनीमध्ये अजून पुरेशी ओल निर्माण झालेली नाही. त्यामुळे मोठ्या पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. आता पर्यंत केवळ पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत. शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

No comments:
Post a Comment