अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम निधीअभावी रखडले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या उपलब्ध निधी संपल्याची माहिती दिल्यानंतर उर्वरित कामांसाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठात पार पडलेल्या या बैठकीस कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, स्मारक समितीचे सदस्य शिवाजी कांबळे, प्रा. शिवाजी बंडगर, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यापीठाचे अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ऑनलाइन उपस्थित होते.
बैठकीतील निर्णयांची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून स्मारकाच्या उर्वरित कामांसाठी शासनाकडे अतिरिक्त निधीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावामध्ये स्मारकाची नियमित स्वच्छता, अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडी किंवा लिफ्टची व्यवस्था, स्मारकाजवळ सहा मीटर रुंदीचा ७० मीटर लांबीचा रस्ता, तसेच अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचे दर्शन घडविणारा कांस्य (ब्राँझ) धातूतील शिल्पपट उभारण्याचा समावेश असणार आहे.
उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी निश्चित करण्यासाठी विद्यापीठाचे अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वास्तुविशारद यांच्या संयुक्त बैठकीत सुधारित अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, सुधारित अंदाजपत्रक आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी स्मारक समितीची पुढील बैठक १७ जुलै रोजी आयोजित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

No comments:
Post a Comment