मोहोळला स्वतंत्र प्रांत कार्यालयाची मागणी; पंढरपूरशी जोडण्यास संघर्ष समितीचा विरोध
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुका हा भौगोलिक, प्रशासकीय आणि जनसुविधेच्या दृष्टीने पूर्वीप्रमाणे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्न ठेवण्यात यावा तसेच मोहोळ येथे स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी दीर्घकालीन आणि सर्वपक्षीय लढा उभारण्याचा निर्धार आज येथे झालेल्या मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड म्हणाले. मोहोळचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण तालुक्याच्या स्वाभिमानाचा आणि जनतेच्या हक्काचा आहे. त्यामुळे या लढ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षाचे जोडे सभागृहाबाहेर ठेवून एकदिलाने काम केले पाहिजे. मोहोळ तालुका पुन्हा सोलापूरलाच जोडण्यासाठी आणि मोहोळ येथे प्रांताधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी दीर्घकालीन, संघटित आणि लोकशाही मार्गाने संघर्ष उभारावा लागेल. जनतेच्या हिताच्या या प्रश्नावर कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
संजय क्षीरसागर यावेळी बोलताना म्हणाले, पंढरपूर येथे नव्याने मंजूर झालेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी मोहोळ तालुका जोडण्याचा निर्णय भौगोलिक वास्तव आणि जनसुविधांच्या दृष्टीने योग्य नाही. मोहोळ तालुक्यातील बहुतांश गावांचा दैनंदिन प्रशासकीय संपर्क सोलापूरशी असून नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी सोलापूर गाठणे अधिक सोयीचे ठरते. त्यामुळे मोहोळचा समावेश पंढरपूरऐवजी सोलापूर प्रशासकीय कार्यक्षेत्रातच कायम ठेवला पाहिजे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यावेळी बोलताना म्हणाले, महसूल विभागाने या संदर्भात हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. हीच योग्य वेळ असून तालुक्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका, विविध संस्था, व्यापारी, शेतकरी, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लेखी हरकती नोंदवून शासनापर्यंत लोकभावना पोहोचवाव्यात. मोहोळ तालुक्याच्या भवितव्याचा हा प्रश्न असल्याने प्रत्येक नागरिकाने या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा.
बैठकीत मोहोळ तालुका पुन्हा सोलापूरशी जोडण्याबरोबरच मोहोळ येथे स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वपक्षीय समन्वय, जनजागृती आणि व्यापक लोकसहभागातून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी सांगितले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख होते. यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र खांडेकर, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक सुशील क्षीरसागर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अंकुश आवताडे, नगरसेवक सतीश काळे, राजेश पवार, विनोद कांबळे, अतुल क्षीरसागर, गणेश गावडे, सुनीता पवार, दीपक गवळी, तन्वीर शेख, सतीश पाटील, अशोक भोसले, सदाशिव कोकरे, दिलीप टेकाळे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment