सोलापूर नालेसफाई गैरव्यवहार प्रकरणाला वेग; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त
रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या निविदा, बिले आणि कामांची होणार सखोल तपासणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त): शहरातील नालेसफाई कंत्राटातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली असून, संबंधित आदेश मंगळवारी जारी करण्यात आले.
भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी नगरअभियंता सारिका आकुलवार यांच्याविरोधात नालेसफाईतील कथित बोगस कामे, बोगस बिले आणि भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर मोठा गदारोळ झाला होता आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली होती.
आयुक्तांच्या आदेशानुसार 'रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स' या कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या नालेसफाई कामातील निविदा प्रक्रिया, कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि देयक वितरणातील अनियमिततेची वस्तुनिष्ठ चौकशी केली जाणार आहे.
चौकशी समितीत अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर आणि कार्यकारी अभियंता निलकंठ मठपती यांचा समावेश असून, समिती संपूर्ण कंत्राट प्रक्रियेची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे.
तक्रारदारांनी या कामामध्ये सुमारे दीड कोटी रुपयांची महापालिकेची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत नगरअभियंता सारिका आकुलवार यांना पदावरून दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
चौकशीत कोणत्या बाबींची होणार तपासणी?
समिती पुढील मुद्द्यांवर सखोल चौकशी करणार आहे:
निविदा प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार पार पडली का?
मंजूर दर डीएसआर किंवा बाजारभावापेक्षा जास्त होते का?
देयक मंजुरीची प्रक्रिया नियमानुसार झाली का?
एकाच स्वरूपाची किंवा 'कॉपी-पेस्ट' बिले सादर करण्यात आली का?
महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले असल्यास त्यास जबाबदार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची निश्चिती.
या प्रकरणामुळे महापालिकेतील नालेसफाई, यंत्रसामग्री भाडे आणि कंत्राटी कामांच्या देयक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता चौकशी अहवाल आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment