भारत-सेशेल्स संबंध अधिक दृढ करण्यावर भर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

भारत-सेशेल्स संबंध अधिक दृढ करण्यावर भर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 

भारत-सेशेल्स संबंध अधिक दृढ करण्यावर भर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर




मुंबई (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र राज्य विधिमंडळात सेशेल्सच्या संसदेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे स्वागत करताना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी भारत आणि सेशेल्स यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिष्टमंडळात सेशेल्स नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अझारेल अर्नेस्टा यांच्यासह संसदेतील सदस्य होते.

सेशेल्स देशाच्या नॅशनल असेंब्लीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने विधानभवन येथे भेट दिली. यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, सचिव २ मेघना तळेकर, सहसचिव ना.रा. थिटे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी भारतातील लोकशाही व्यवस्था, विधिमंडळाची रचना, राज्याची आर्थिक व औद्योगिक प्रगती तसेच पायाभूत सुविधांबाबत शिष्टमंडळाला माहिती दिली. भारत आणि सेशेल्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना दीर्घ इतिहास असून, दोन्ही देशांमधील मैत्री आणि सहकार्य सातत्याने वृद्धिंगत होत असल्याचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.

सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाचे महाराष्ट्रात स्वागत करणे हा विशेष आनंदाचा क्षण आहे.भारतात संघराज्यीय शासन व्यवस्था असून केंद्र आणि राज्य पातळीवर लोकशाही संस्था कार्यरत आहेत, असे सांगून ॲड. नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या द्वि सभागृह पद्धती विषयी माहिती दिली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले की,  महाराष्ट्राची ओळख देशाची आर्थिक शक्ती म्हणून असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र अग्रस्थानी असून थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यातही राज्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध नैसर्गिक व भौगोलिक साधनसंपत्तीचाही त्यांनी उल्लेख केला. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत विस्तीर्ण किनारपट्टी, कृषी क्षेत्रातील क्षमता आणि विविध नैसर्गिक संसाधनांमुळे राज्याच्या विकासाला मोठी ताकद मिळत आहे, असेही यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी नमूद केले.

भारत आणि सेशेल्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत आणि फलदायी करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत भारत आणि सेशेल्स हे प्रादेशिक स्थैर्य आणि सहकार्याच्या दृष्टीने महत्वाचे भागीदार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सेशेल्समध्ये योग आणि आयुर्वेदाबाबत मोठी रुची असून आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी आहे. सेशेल्समधील पर्यटन आणि रिसॉर्ट क्षेत्रामध्ये योग व आयुर्वेदाशी संबंधित सेवा विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातील संस्था आणि तज्ज्ञांचे सहकार्य मिळू शकते, असे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी नमूद केले.

सेशेल्सच्या संसदीय व्यवस्थेत भारताशी अनेक साधर्म्य – अझारेल अर्नेस्टा

सेशेल्सच्या शासनप्रणालीमध्ये विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायव्यवस्था यांच्यात अधिकारांची स्पष्ट विभागणी असून, ही व्यवस्था भारतासह इतर लोकशाही देशांच्या संसदीय व्यवस्थेशी अनेक बाबतींत साधर्म्य राखते, असे सेशेल्स नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षा अझारेल अर्नेस्टा यांनी सांगितले.

भारत आणि सेशेल्स यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि घनिष्ठ संबंध असून, दोन्ही देशांच्या लोकशाही व संसदीय परंपरांमध्ये परस्पर अनुभवांची देवाणघेवाण महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी सेशेल्सच्या शिष्टमंडळाचे आभार मानले.  भारत आणि सेशेल्समध्ये अनेक समान बाबी असून, विविध क्षेत्रांत एकत्रितपणे काम करण्याची संधी आहे.  भविष्यात परस्पर भेटी आणि संवाद वाढत राहावेत, असेही यावेळी उपसभापती अहिर यांनी सांगितले.

यावेळी सेशेल्स देशाच्या नॅशनल असेंब्लीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने विधानभवन येथील विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांना भेट देऊन पाहणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages