दूषित पाण्यामुळे शहरात ४० जणांना अतिसाराची लागण; महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

दूषित पाण्यामुळे शहरात ४० जणांना अतिसाराची लागण; महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान

 दूषित पाण्यामुळे शहरात ४० जणांना अतिसाराची लागण; महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान

सोलापूर (कटूसत्य वृत्त): सततच्या पावसामुळे ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन जलवाहिनीत दूषित पाणी मिसळल्याचा संशय व्यक्त होत असतानाच होटगी रोड परिसरातील आसरा चौक येथील एस. बी. प्लाझा या इमारतीतील तब्बल ४० रहिवाशांना अतिसाराची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असून महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

एस. बी. प्लाझामध्ये सुमारे ३५ कुटुंबे वास्तव्यास असून सर्व फ्लॅट्सना एकाच जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. परिसरातील जुनी ड्रेनेज लाइन सतत ओव्हरफ्लो होत असल्याने मैलामिश्रित पाणी जलवाहिनीत शिरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, एकाच इमारतीतील मोठ्या संख्येने नागरिकांना अतिसाराचा त्रास सुरू झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

महापालिकेच्या साथरोग तज्ज्ञ डॉ. सुहासिनी वाळवेकर यांनी प्राथमिक पाहणीनंतर हा प्रादुर्भाव दूषित पाण्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला. आरोग्य विभागाने परिसरात स्वच्छता मोहीम राबवून निर्जंतुकीकरणाची फवारणी केली असून, ३५ घरांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर संसर्गाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, स्थानिक नगरसेवक अझहर हुंडेकरी यांनी परिसरातील जीर्ण ड्रेनेज लाइन बदलण्याची मागणी अनेकदा करूनही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०१० च्या दुर्दैवी घटनेची आठवण

या घटनेमुळे २०१० मधील दूषित पाणीपुरवठ्याच्या दुर्घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्यावेळी क्रांतीनगर, जगजीवनराम झोपडपट्टी आणि भगवाननगर परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथीचा उद्रेक होऊन २१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने विशेष तज्ज्ञ पथक नेमून जलवाहिनीत दूषित पाणी मिसळण्याचे ठिकाण शोधून समस्या दूर केली होती.

सध्याच्या घटनेनंतरही नागरिकांनी तातडीने जलवाहिनी व ड्रेनेज व्यवस्थेची सखोल तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages