एनओसीविना होटगी रोडवर रस्त्याचे काम; महापालिकेचा आक्षेप, पुढील निर्णयासाठी बैठक
सोलापूर (कटूसत्य वृत्त): होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळ परिसर आणि तेथून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापर्यंत विकसित करण्यात येत असलेल्या प्रमुख रस्त्याच्या कामावर महापालिकेने गंभीर आक्षेप घेतला आहे. आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) न घेता रस्त्याचे काम सुरू ठेवल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन संबंधित एमएसआयडीसी आणि इतर विभागांसोबत पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, एमएसआयडीसीमार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन, ड्रेनेज लाईन आणि जलवाहिन्यांशी संबंधित कामांसाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. भूमिगत सुविधा स्थलांतरित करून आवश्यक दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य (ड्रेनेज) विभागाने संबंधित कंपनीला दिल्या होत्या.
मे २०२५ मध्ये झालेल्या संयुक्त पाहणीत नीलकमल मॅट्रेसेस, क्रोमा ते हुंदाई शोरूम, युगंधर हॉस्पिटल, नवोदय नगर, अंत्रोळीकर नगर, विमानतळ परिसर, शिवशाही कंपाऊंड आणि शंकर नगर या भागांमध्ये ड्रेनेज लाईन, रस्ता क्रॉसिंग आणि इतर भूमिगत सुविधांबाबत आवश्यक कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने संबंधित यंत्रणेला तीन वेळा पत्रव्यवहार करून भूमिगत सुविधा तातडीने स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा भविष्यात पाणीपुरवठा किंवा ड्रेनेज दुरुस्तीसाठी नव्याने तयार झालेला रस्ता पुन्हा खोदावा लागण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच रस्त्याची उंची तीन ते चार फूट वाढविण्यात आल्याने भविष्यात देखभाल व दुरुस्तीची कामे अधिक कठीण होऊ शकतात, असेही महापालिकेने स्पष्ट केले होते.
मात्र, संबंधित सूचनांची अंमलबजावणी न झाल्याने आता या प्रकरणी पुढील कारवाईसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत अंतिम निर्णय बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
No comments:
Post a Comment