'एसटी'तील प्रथमोपचार पेटी रिकामी; वायफाय, चार्जिंग सुविधाही ठप्प
२५ हून अधिक बसची पाहणी; प्रवाशांच्या सुरक्षेसह मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बसमध्ये प्रथमोपचार पेटी, मोफत वायफाय, मोबाइल चार्जिंग पॉइंट आणि अग्निशमन यंत्र अशा विविध सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. मात्र, सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या बसच्या पाहणीत या सुविधा बहुतांश बसमध्ये केवळ कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली प्रथमोपचार पेटी अनेक बसमध्ये रिकामी असल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रविवारी दुपारी १२ ते २ या वेळेत सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या २५ हून अधिक बसांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये मोजक्याच बसमध्ये प्रथमोपचार पेटी सुस्थितीत होती. बहुतांश बसमध्ये पेटी असली तरी त्यामध्ये आवश्यक औषधे व प्राथमिक उपचार साहित्य नव्हते. काही बसमध्ये प्रथमोपचार पेटी अस्ताव्यस्त अवस्थेत होती, तर काही ठिकाणी तिचा वापर मच्छर अगरबत्ती ठेवण्यासाठी होत असल्याचेही दिसून आले.
प्रवाशांसाठी जाहीर करण्यात आलेली मोफत वायफाय सेवा एकाही बसमध्ये कार्यरत नसल्याचे आढळले. तसेच मोबाइल चार्जिंग पॉइंटची सुविधा प्रामुख्याने नव्या बसपुरतीच मर्यादित असून, जुन्या बसमध्ये ती उपलब्ध नाही. ज्या बसमध्ये चार्जिंग पॉइंट आहेत, त्यांपैकी अनेक ठिकाणी ते बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या.
चौकट : प्रथमोपचार पेटीच रिकामी
प्रत्येक एसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी असणे बंधनकारक आहे. मात्र, पाहणीदरम्यान बहुतांश बसमधील पेट्या रिकाम्या असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पेट्या असल्या तरी त्यामधील औषधे व आवश्यक साहित्य गायब होते. अपघात किंवा किरकोळ दुखापतीच्या प्रसंगी ही निष्काळजीपणा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.
संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करत बसमधील सुरक्षा सुविधांची नियमित तपासणी आणि देखभाल करण्याची मागणी केली.
चौकट : अग्निशमन यंत्रांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
पाहणीदरम्यान अनेक बसमधील अग्निशमन यंत्रेही दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे आढळले. काही यंत्रांचे नूतनीकरण अनेक वर्षांपासून झाले नसल्याचे, तर काहींवरील तपासणीची माहितीही अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आले. आपत्कालीन परिस्थितीत ही यंत्रे प्रभावी ठरण्यासाठी त्यांची नियमित तपासणी व देखभाल होणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment