अंधश्रद्धेला मशाल दाखवत तरुणांनी भीतीची केली होळी
माशाळ नगरातील तरुणांचा धाडसी पुढाकार; आक्षेपार्ह साहित्य हटवून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : समाजात विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रसार होत असला तरी अंधश्रद्धेच्या घटनाही अधूनमधून समोर येत आहेत. माशाळ नगर येथे रविवारी सकाळी रस्त्याच्या कडेला बाहुली, टाचण्या, लिंबू आणि धारदार वस्तूंचा समावेश असलेले संशयास्पद साहित्य आढळल्यानंतर स्थानिक तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता ते हटवून भररस्त्यात त्याची होळी केली. या कृतीतून त्यांनी अंधश्रद्धेला ठाम विरोध करत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश दिला.
माशाळ नगरात यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हेमंत पवार, अॅड. अभिजित पाटील, प्रशांत बुरुडकर, मंगेश पवार, महादेव काटकर, बाळ बुरूडकर, सचिन गुत्तेदार, शिवा ईश्वरकट्टी आणि राहुल लाड या तरुणांनी पुढाकार घेत संशयास्पद साहित्य गोळा केले. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत त्याची विल्हेवाट लावत अंधश्रद्धेच्या भीतीवर प्रहार केला.
स्थानिक तरुण राहुल लाड यांनी सांगितले की, "अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्यापेक्षा अशा प्रकारांकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. भीती न बाळगता समाजात विवेकाचा संदेश पोहोचवणे ही काळाची गरज आहे."
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे स्वागत
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांनी या कृतीचे स्वागत करत, अशा प्रकारच्या वस्तूंमुळे कोणतेही अहित होत नसल्याचे पुन्हा अधोरेखित केले. भीती ही मानवी मनाची निर्मिती असून, तरुणांच्या या कृतीमुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
चौकट : नागरिकांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची कृती
हा प्रकार केवळ अंधश्रद्धेपुरता मर्यादित नव्हता. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मोठ्या टाचण्या आणि धारदार वस्तूंमुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना तसेच मुक्या प्राण्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. संभाव्य अपघात टाळण्यासाठी तरुणांनी तातडीने हे साहित्य हटवून परिसर स्वच्छ केला. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कृती महत्त्वाची ठरली.
No comments:
Post a Comment