चिकलठाणचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

चिकलठाणचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

 चिकलठाणचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

८ तास वीजपुरवठ्याबाबत प्रशासनाचे आश्वासन






 करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील चिकलठाण येथील श्री टोप्या बाबा मंदिर प्रांगणात शेतीपंपासाठी दररोज सलग ८ तास वीज पुरवठा मिळावा, या मुख्य मागणीसाठी स्थानिक धरणग्रस्त शेतकरी व युवकांनी २६ जुलै २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला बळ देण्यासाठी करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी २७ जुलै रोजी प्रत्यक्ष उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलकांसोबत उपोषणास बसून पूर्ण पाठिंबा दर्शवला.
​विजेच्या तीव्र कपातीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि प्रशासनाच्या अनास्थेविरोधात चिकलठाण परिसरातील शेतकरी आक्रमक झाले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी उपोषणस्थळाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी तात्काळ संबंधित महावितरण व वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
​प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मॅडम यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. प्रशासनाच्या आवाहनाला आणि विनंतीला मान देऊन उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, येत्या २ दिवसांत शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर यापेक्षा मोठ्या संख्येने एकत्रित येऊन पुन्हा तीव्र उपोषण छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
​या आमरण उपोषणात अविनाश सरडे, विनोद सय्यद, योगेश सरडे, संदीप सरडे, दादासाहेब सरडे, शंकर बोंद्रे, सचिन गाडे, रंजीत गव्हाणे, धुळाभाऊ कोकरे, सुभाष गुळवे, दिनकर सरडे, महादेव कामठे, चंद्रकांत सरडे, चंद्रकांत सुरवसे, सुनील सरडे, बापूराव सरडे, तानाजी सरडे, अतुल सरडे, नितीन सरडे, अमोल सरडे, रावसाहेब नेमाने, अमोल शेळके, पप्पू गव्हाणे, वीरेंद्र प्रताप गलांडे, बिंटू झोळ, राजेंद्र बारकुंड, राजाभाऊ कवितके, दादासाहेब लबडे, हनुमंत सरडे, कैलास बोंद्रे, ज्योतीराम पवार यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधव व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
​या गंभीर समस्येबाबत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सविस्तर मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार पुढील २४ तासांच्या आत या मागणीवर योग्य ती कारवाई करून वीज पुरवठ्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, अशी पक्की खात्री प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
​उपोषणस्थळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंभूराजे जगताप यांनी प्रशासनाच्या धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "कै. नामदेवरावजी जगताप यांच्या योगदानातून व दूरदृष्टीने आकारास आलेले उजनी धरण हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची 'जीवनदायिनी' मानले जाते. या जीवनदायिनीसाठी करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी देऊन मोलाचे योगदान दिले आहे. परंतु, दुर्दैवाने याच करमाळा तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांवर कायमस्वरूपी अन्याय केला जात आहे — मग तो शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न असो किंवा राखीव पाण्याचा!"
​ते पुढे म्हणाले, "आज उजनी धरण ५०% हून अधिक भरलेले असतानाही केवळ करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कपात केली जात आहे. यामुळे सामान्य शेतकरी आणि जनतेमध्ये सत्ताधारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. भविष्यात आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्षपात, जातीवाद किंवा गट-तट न पाहता सर्व शेतकरी वर्गाने संघटित होऊन एका छताखाली लढा दिला पाहिजे."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages