सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील; व्हाईस चेअरमनपदी गुलाबराव पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 15, 2026

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील; व्हाईस चेअरमनपदी गुलाबराव पाटील

 सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील; व्हाईस चेअरमनपदी गुलाबराव पाटील






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सहकार चळवळीतील अग्रगण्य आणि विश्वासार्ह संस्था म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर या संस्थेच्या चेअरमनपदी ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजी महादेव पाटील (दक्षिण सोलापूर शाखा) यांची, तर व्हाईस चेअरमनपदी गुलाबराव पाटील (सांगोला शाखा) यांची सर्व संचालकांच्या बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दि. १२ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकार कार्यालयाचे अधिकारी आबासाहेब गावडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य शिक्षक नेते बाळासाहेब काळे होते. व्यासपीठावर अखिल भारतीय शिक्षक संघाचे राष्ट्रीय सचिव म. ज. मोरे, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध पवार, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष बब्रुवाहन काशिद, जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड, रणजीत थिटे, संस्थेचे माजी चेअरमन संभाजीराव फुले, माजी व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील, रावसाहेब जाधवर, राज्य उपाध्यक्ष सिद्राम कटगेरी, राज्य सदस्य रेवणसिद्ध हत्तुरे, जिल्हा सरचिटणीस रामभाऊ यादव यांच्यासह संचालक विठ्ठलराव काळे, तानाजी गुंड, संजय चेळेकर, रमेश शिंदे, हणमंत सरडे, आबासाहेब जाधवर, रमेश घंटेनवरू, प्रमोद लोंढे, राजेंद्र आवारे, पांडुरंग नाईकनवरे, अशोक पोमाजी, शितल चव्हाण, राणी व्हनमाने, तज्ञ संचालक बाबासाहेब दराडे, तिकटे सर, जिल्हा कार्यकारी सचिव सतीश वाले, काळाप्पा सुतार, दयानंद वठारे, प्रकाश कुंभार, महबूब सवार, बसवराज खिल्लारी, पिरप्पा हडपद तसेच अनेक शिक्षक पदाधिकारी, संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन शिवाजी महादेव पाटील यांनी आपल्या मनोगतात सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक, प्रामाणिक आणि सभासदकेंद्रित ठेवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. संस्थेची आर्थिक प्रगती, तंत्रज्ञानाधारित आधुनिक सेवा, सभासदांना जलद व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक शिक्षकाच्या हिताचे संरक्षण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट राहील," असे त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन गुलाबराव पाटील यांनीही सर्व संचालक व सभासदांचे आभार मानत, "माझ्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे पूर्ण प्रामाणिकपणे पालन करीन. चेअरमन, संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक सभासदांच्या सहकार्याने संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकदिलाने काम करू. प्रत्येक शिक्षकाच्या अडचणीच्या काळात पतसंस्था आधारवड ठरेल, यासाठी प्रयत्नशील राहू," असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सभासदाभिमुख बनेल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पतसंस्थेची भूमिका अधिक प्रभावी होईल आणि सहकार चळवळीला नवे बळ मिळेल, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचा समारोप अभिनंदन, शुभेच्छा आणि संस्थेच्या भावी वाटचालीसाठी सर्वांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक संकल्पांसह उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages