शिवकुमार ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या दरोडा; चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

शिवकुमार ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या दरोडा; चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके

 शिवकुमार ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या दरोडा; चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके


सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शहराच्या मध्यवर्ती भागातील ७० फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये शनिवारी दुपारी झालेल्या धाडसी दरोड्याने शहरात खळबळ उडाली आहे. पिस्तूल आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत तिघा दरोडेखोरांनी सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर आरोपींच्या शोधासाठी सोलापूर शहर पोलिसांनी सहा विशेष पथके कार्यरत केली आहेत.

याप्रकरणी खुर्शिद आलम शेख (रा. भारतरत्न इंदिरा नगर, सोलापूर) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिघेजण शिवकुमार ज्वेलर्समध्ये दाखल झाले. त्यापैकी एकाच्या हातात लोखंडी रॉड तर दुसऱ्याच्या हातात पिस्तूल होते.

दुकानातील संशयास्पद हालचाली पाहून दुकानदार खुर्शिद शेख यांनी तत्काळ आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिक दुकानाकडे धाव घेऊ लागले. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच एका दरोडेखोराने हातात मावतील तेवढे सोन्याचे दागिने उचलले, तर दुसऱ्याने पिस्तूल दाखवून दहशत निर्माण केली. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पायी पसार झाले.

पोलिस तपासात दरोडेखोरांनी वापरलेली दुचाकी आदल्या दिवशी कुर्डुवाडी येथील एका हौसिंग सोसायटीमधून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर आरोपींनी अंगावरील शर्ट बदलून बोळाबोळातून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये संशयित दिसत असले तरी त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे शरीरयष्टी, चालण्याची पद्धत आणि इतर वैशिष्ट्यांच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत असून आरोपींच्या शोधासाठी सदर बझार पोलीस ठाण्याची दोन आणि शहर गुन्हे शाखेची चार अशी एकूण सहा विशेष पथके कार्यरत आहेत.

चौकट

आरडाओरडीमुळे मोठा अनर्थ टळला

दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करताच दुकानदार खुर्शिद शेख यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केली. त्यामुळे नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले आणि दरोडेखोरांना घाईघाईने पळ काढावा लागला. अन्यथा अधिक मोठी लूट किंवा गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages