अवैध वाळू उपशावर मध्यरात्री पोलिसांचा छापा; १.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त
सांगोला (कटूसत्य वृत्त) : तालुक्यातील जवळे गावाखालील पांढरे वस्ती परिसरातील कोरडा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर सांगोला पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून तब्बल १ कोटी २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहा वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आले असून अवैध वाळू तस्करीविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला पोलीस रात्रगस्त पथक गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत जवळे येथील पांढरे वस्ती परिसरातील कोरडा नदीपात्रात विनापरवाना वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर-ट्रॉली आणि टिप्परद्वारे वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती तत्काळ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार रात्रगस्त पथकाने शनिवारी मध्यरात्री सुमारे २.१५ वाजता घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी तीन जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातून वाळूचा उपसा करून दोन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एका टिप्परमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित वाहनचालकांना ताब्यात घेतले. दरम्यान, एका जेसीबीचा चालक समाधान महादेव हजारे हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतले.
या कारवाईत निखिल नायकुडे (रा. भोपसेवाडी), आगलावे, स्वप्निल तोडकर (रा. आगलावेवाडी), रोहन देवकते (रा. वाकी घेरडी), शेखर लवटे (रा. आलेगाव) आणि समाधान हजारे (रा. पांढरे वस्ती) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी ९० लाख रुपये किमतीचे तीन जेसीबी, वाळूसह १६ लाख १४ हजार रुपये किमतीचे दोन स्वराज्य ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच १५ लाख रुपये किमतीचा टिप्पर असा एकूण १ कोटी २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गुरव, सागर पाटील, हेड कॉन्स्टेबल असलम काझी, नवनाथ सावंत, सद्दाम नदाफ, मच्छिंद्र माळी, मारुती पांढरे आणि चालक सोमनाथ भोई यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
No comments:
Post a Comment