अक्कलकोट तालुक्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट; कारवाईची नागरिकांची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

अक्कलकोट तालुक्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट; कारवाईची नागरिकांची मागणी

 अक्कलकोट तालुक्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट; कारवाईची नागरिकांची मागणी

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट तालुक्यातील उत्तर, दक्षिण आणि वळसंग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसायांचा सुळसुळाट वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून मटका, हातभट्टी दारू, जुगार अड्डे, अवैध लॉजिंग, अनधिकृत वाहतूक तसेच वाळू तस्करीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यात विविध ठिकाणी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची चर्चा असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. संबंधित विभागांनी विशेष मोहीम राबवून अशा व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दररोज हजारो भाविक येत असल्याने शहरात मोठी गर्दी होत आहे. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे शहरातील प्रमुख चौक व मंदिर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी असल्याने वाहतूक व्यवस्थापनावर ताण येत असल्याचे बोलले जात आहे.

प्रमुख चौक व मंदिर परिसरात अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी तसेच जिल्हा वाहतूक शाखेची मदत घ्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

याशिवाय, काही रिक्षाचालकांकडून श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. रिक्षांमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, अनावश्यक हॉर्नचा वापर करणे तसेच अर्वाच्य वर्तन करणे हे तीर्थक्षेत्राच्या पवित्र वातावरणाला बाधक असल्याची नाराजी भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

रिक्षा भाडे निश्चिती करून प्रत्येक रिक्षा थांब्यावर अधिकृत दरफलक लावण्यात यावेत, चालकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात यावा तसेच जीर्ण आणि नियमबाह्य रिक्षांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages