भीमाकाठी पाणी उपशावर निर्बंध; केवळ दोन तास वीजपुरवठा, शेतकऱ्यांमध्ये संताप
संभाव्य दुष्काळसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची उपाययोजना; शेतकरी संघटनांचा फेरविचाराची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या आगमनास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भीमा नदीतील पाण्याचा उपसा नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धरणे, नद्या आणि मध्यम प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याच्या उद्देशाने भीमा नदीकाठी दिवसातून केवळ दोन तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा मिळत होता. त्यानंतर तो सहा तासांवर आणण्यात आला आणि आता थेट दोन तासांपर्यंत मर्यादित करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
जून महिन्याचा पंधरवडा उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे आणखी धक्का बसला आहे. उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने जपून ठेवलेली पिके पाण्याअभावी करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त करत आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी स्पष्ट केले की, वीजपुरवठ्यातील ही कपात केवळ नदीकाठी पाणी उपसा करणाऱ्या यंत्रणांसाठी लागू आहे. विहिरी किंवा कूपनलिकांद्वारे सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांवर या आदेशाचा परिणाम होणार नाही.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हा आदेश मागे घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
चौकट : सोलापूरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम नाही
भीमा नदीकाठी वीजपुरवठ्यात कपात करण्यात आली असली तरी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा कोणताही तातडीचा परिणाम होणार नसल्याचे महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी स्पष्ट केले. शहरासाठी थेट उजनी धरणातून पाण्याचा उपसा केला जातो. टाकळी-सोरेगाव योजनेवर अवलंबित्व असते तर पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असता. तसेच दुहेरी जलवाहिनी योजना कार्यान्वित असल्याने सध्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे कोणतेही नियोजन नाही. मात्र, वीज निर्मितीवर परिणाम होऊन वीजटंचाई निर्माण झाल्यास पाणीपुरवठ्याचे स्वतंत्र नियोजन करावे लागू शकते, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment