ज्ञानेश्वर माउलींची अमृतवाणी घुमणार ७५० भक्तांच्या मुखातून
श्री सिद्धेश्वर फाउंडेशनतर्फे ५ ते १२ जूनदरम्यान ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त तसेच अधिक मासाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने ५ ते १२ जून या कालावधीत भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ७५० भाविकांच्या सामूहिक सहभागातून होणारा हा सोहळा सोलापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार असून, आठ दिवस ज्ञानेश्वर माउलींची अमृतवाणी भक्तांच्या मुखातून अखंड घुमणार आहे.
जामगुंडी लॉन्स येथे होणाऱ्या या सोहळ्याची माहिती पत्रकार परिषदेत सोहळा समितीचे अध्यक्ष सतीश मालू आणि डॉ. अनिल सर्जे यांनी दिली. यावेळी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आळंदीच्या विश्वस्तांच्या हस्ते उद्घाटन
या पारायण सोहळ्याचे उद्घाटन ५ जून रोजी दुपारी १ वाजता आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माउली देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज यांच्या हस्ते होणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या जयंती वर्षात होत असलेल्या या उपक्रमामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समारोपाच्या दिवशी म्हणजे १२ जून रोजी काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष सद्गुरू ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित राहणार आहेत. कीर्तनानंतर अयोध्येचे जगद्गुरू डॉ. राघवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन होणार असून, हा कार्यक्रम सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
९ ते ८३ वयोगटातील भाविकांचा सहभाग
ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. काशीनाथ महाराज सर्जे करणार आहेत. विशेष म्हणजे या पारायणात ९ वर्षांच्या बालकांपासून ते ८३ वर्षांच्या ज्येष्ठ भाविकांपर्यंत विविध वयोगटातील ७५० भक्त सहभागी होणार आहेत. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
दररोज दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत पारायणाचे सत्र होणार असून, या कालावधीत ज्ञानेश्वरीच्या अध्यायांचे सामूहिक वाचन, अर्थ चिंतन आणि भक्तिरसाचा अनुभव भाविकांना घेता येणार आहे.
सहभागींसाठी विशेष सुविधा
पारायणात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी अल्पोपहार, चहा आणि सरबताची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ उपलब्ध नाही, अशा सर्व भाविकांना ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. ही महत्त्वपूर्ण सेवा सीमाताई खोडके यांनी उपलब्ध करून दिली आहे.
लोकसहभागातून साकारत असलेल्या या धार्मिक उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि भक्तांनी आर्थिक तसेच स्वयंसेवी स्वरूपात योगदान दिले आहे. त्यामुळे हा सोहळा सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक सहभागाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
ग्रंथदिंडीने होणार सांगता
सोहळ्याच्या समारोपानिमित्त १२ जून रोजी सकाळी ७ वाजता आसरा दत्त मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि वारकरी परंपरेच्या उत्साहपूर्ण वातावरणात ही दिंडी शहरातून मार्गक्रमण करणार आहे.
यानंतर काल्याचे कीर्तन, जगद्गुरूंचे आशीर्वचन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सोलापूर शहरातील विविध भजनी मंडळे, दिंडी मंडळे, वारकरी संप्रदायातील भाविक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
संत विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प
ज्ञानेश्वर माउलींच्या तत्त्वज्ञानाचा आणि वारकरी परंपरेच्या मूल्यांचा समाजात व्यापक प्रसार व्हावा, युवकांना अध्यात्माची गोडी लागावी आणि अधिक मासाच्या पुण्यकाळात भक्तांना सामूहिक साधनेची संधी मिळावी, या उद्देशाने या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सोहळ्याचा लाभ सोलापूरातील सर्व भजनी मंडळे, वारकरी संप्रदायातील भाविक तसेच नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे मार्गदर्शक नामदेव पुकळे आणि डॉ. अनिल सर्जे यांनी केले.
पत्रकार परिषदेला सिद्धार्थ सर्जे, राजेंद्र बलसुरे, दत्तात्रय पाठक, दिलीप पोतदार, गुरुलिंग कल्लूरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment