मार्कंडेय रुग्णालयात अत्याधुनिक ‘फॅको मशीन’ दाखल; मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता अधिक सुलभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- पूर्व भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक अल्कॉन सेच्युरियन कंपनीचे फॅको मशीन दाखल झाले आहे. या मशीनचा शुभारंभ रुग्णालयाचे प्रेसिडेंट **सत्यनारायण बोल्ली** यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
मार्कंडेय रुग्णालयात सातत्याने आधुनिक वैद्यकीय उपकरणांची भर पडत असून त्याचा थेट लाभ रुग्णांना होत आहे. नव्याने दाखल झालेल्या फॅको मशीनमुळे नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे उपकरण देशातील मोजक्याच रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. या मशीनच्या साहाय्याने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अवघ्या **१० मिनिटांत** पूर्ण करता येते. तसेच **विनाइंजेक्शन आणि विनाटाके** शस्त्रक्रिया होणार असल्याने रुग्णांना कमी त्रास सहन करावा लागतो. उपचारानंतर रुग्ण अल्पावधीतच घरी परतू शकतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढणार असून रुग्णांना अधिक सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पूर्व भागातील तसेच जिल्ह्यातील नेत्ररुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी रुग्णालयाचे चेअरमन **डॉ. माणिक गुरळम**, व्हाइस चेअरमन **रमेश विडप**, **डॉ. लता मिलाकोल, अशोक आडम, राजेशम येमूल, सुधाकर गुंडेली** आदी उपस्थित होते. तसेच नेत्ररोगतज्ज्ञ **डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. अमित पोरेंडी, डॉ. क्षमा कदम, डॉ. मंजूनाथ पाटील, डॉ. भास्कर विटकूल, डॉ. एस. जयराम** तसेच प्रशासकीय अधिकारी **स्वामी आकेत** यांच्यासह वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
फॅको मशीनची वैशिष्ट्ये
* मोतीबिंदू शस्त्रक्रिया अवघ्या १० मिनिटांत पूर्ण
* विनाइंजेक्शन व विनाटाके शस्त्रक्रिया
* कमी वेदना व कमी त्रास
* जलद रिकव्हरी, रुग्ण लवकर घरी परतू शकतात
* अत्याधुनिक व उच्च अचूकतेचे तंत्रज्ञान
* नेत्ररुग्णांसाठी अधिक सुरक्षित आणि परिणामकारक उपचार सुविधा
No comments:
Post a Comment