पक्ष, झेंडा बाजूला ठेवून या.
6 जून रोजी जंतरमंतरवर होणार गर्दीचा उच्चांक?
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरणाई झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी भारतीय कॉक्रोच पार्टीची स्थापना करण्यात आली.
भारतीय कॉक्रोच पार्टीला देशातील तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील तरुण असलेल्या अभिजीत दीपके यांनी या कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. दरम्यान आतापर्यंत ही पार्टी फक्त सोशल मीडियावरच सक्रिय होती. परंतु आता पहिल्यांदाच ही पार्टी प्रत्यक्षात मैदानात उतरणार आहे. तरुणाईचे विविध प्रश्न घेऊन येत्या 6 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे. आता या आंदोलनाला तरुणाईचा किती प्रतिसाद मिळतो? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज या सर्व पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास, विजेता दहिया आणि आशुतोष रांका यांनी या पत्रकार परिषदेमधून 6 जून रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका मांडली आहे. पक्ष, झेंडा बाजूला ठेऊन सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन या पार्टीच्या वतीने करण्यात आलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टी ही तरुणांची चळवळ आहे. आम्हाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. अभिजीत दीपके दिल्लीत येत आहेत, त्यांनी शांततेत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हाव, सोनम वांगचुक देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 6 जून रोजी अभिजित दीपके दिल्लीत येत आहेत. सकाळी 8 वाजता दीपके दिल्ली विमानतळावर पोहोचतील, आम्ही सगळे सोनम वांगचुक यांच्यासह विमानतळावर असू, तिथून आम्ही पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला जाणार आहोत. तिथून आम्ही जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणार आहोत. सगळ्या लोकांचं या आंदोलनात स्वागत आहे. किती लोक 6 तारखेच्या आंदोलनात सहभागी होतील, हे आज सांगता येणार नाही. आम्ही फक्त तरुणांनाच नाही तर सगळ्यांनाच आवाहान करतो की, या आंदोलनात सहभागी व्हावं, अशी भूमिका या पत्रकार परिषदेमधून मांडण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment