बेरोजगारी आणि महागाईने सामान्य माणसांचं जगणं कठीण!
नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन
नवी मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही काळापासून देशातील महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडलं आहे. एकीकडे महागाई आणि दुसरीकडे बेरोजगारी यामुळे संकट आणखी वाढले आहे. याच प्रश्नांबाबत नवी मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले.सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जेव्हा पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले त्यावेळी मोठा राडा झाला. राष्ट्रवादीच्या अनेक आंदोलकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. यात रोहिणी खडसे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड या नेत्यांचा समावेश आहे.
नवी मुंबईतील या आंदोलनात आंदोलकांनी चूल मांडून आणि भांडी वाजवून आंदोलन केले. सिडको एक्झिबिशन बाहेर पोलिसांचा मोर्चा अडवण्यात आल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यावेळी शाब्दिक चकमक आणि ढकलाढकली झाली. यावेळी सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. रोहिणी खडसे सक्षणा सलगर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. खडसे यांना पोलिसांनी उचलून नेलं.
या आंदोलनाच्यावेळी कार्यकर्त्यांनी भररस्त्यात खाली बसून, रस्त्यावरच चूल पेटवून भाकरी थापली. यावेळी रोहित पवार या महिला कार्यकर्त्यांसोबत होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, लोकांचं जीवन अवघड होत चाललं आहे. पेट्रोलचे, डिझेलचे भाव वाढलेत. घरगुती गॅस महागला, कमर्शिअल गॅसचेही दर वाढलेत ना.यामुळे सामान्य व्यक्ती, मिडल क्लास चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यांच्यावतीने, त्यांचा आवाज बनून, सरकारपर्यंत त्यांचा आवाज जावा, झोपलेल्या सरकारला कुठेतरी जाग यावी या हेतूने आम्ही हे आंदोलन करत आहोत. कोणालातरी लोकांच्या बाजून लढावे लागेल ना. सरकार ऐके, न ऐकेल, काय होईल माहीत नाही, पण लढणे ही आमची भूमिका आहे. लोकांसाठी बोलणं ही आमची भूमिका आहे. लोकांच्या वतीने आम्ही बोलत आहोत, लढत आहोत, असे पवार यांनी म्हटले.
देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे- सुप्रिया सुळे
आंदोलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, राज्याची नव्हे तर देशाची आर्थिक परिस्थिती ही प्रचंड अडचणीत आहे. याबद्दल आम्ही सगळे वारंवार बोललो आहोत. माझी भारत सरकारला विनंती आहे की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे. राजकारणाचा विषय नाहीये, महागाईमुळे भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा हा विषय आहे. इमानदार, सामान्य माणूस यात भरडला जातोय, हे होणार आहे, आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून पार्लमेंटमध्ये वारंवार बोलूनही दाखवले आहे, त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असे सुळे यांनी म्हटले आहे.
'सरकार हमसे डरती हें, पोलिस को आगे करती हें'
दरम्यान, पोलिसांनी बाळाचा वापर करून रोहित पवार यांच्यासह शशिकांत शिंदे व जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'सरकार हमसे डरती हें, पोलिस को आगे करती हें', अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलन सुरू असताना नेत्यांना अटक करणे चुकीचे- जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, सुरू असलेल्या आंदोलनातून नेत्यांना पकडून घेऊन जाणे हे अत्यंत चुकीचे आहे. याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रात तसेच देशात महागाई प्रचंड वाढली आहे. दररोज पेपर उघडला की दिसते, पेट्रोल वाढले आहे, डिझेल वाढले आहे, भाजी वाढली आहे. त्यामुळे सामान्य जनता प्रचंड अस्वस्थ झाली आहे आणि त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आजचा हा राष्ट्रवादीतर्फे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख नेते आणि इथली स्थानिक जनता एकत्रित येऊन मोर्चा काढला, तर नेत्यांना अटक केली गेली. मी जरा उशिरा पोहोचलो म्हणून त्यातून मी वाचलो.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र सरकारने जे टॅक्स लावले जातात ते जरा कमी केला तर पेट्रोल 70-80 रुपयांवर येईल. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना तुम्हाला 60 रुपये पेट्रोल चालत नव्हते, तर आता तुम्हाला संधी आहे सगळा टॅक्स काढून टाका आणि 70-80 रुपयांत पेट्रोल डिझेल विकायला परवानगी द्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment