यत्नाळ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अनुदान प्रकरणी कारवाईची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 17, 2026

यत्नाळ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अनुदान प्रकरणी कारवाईची मागणी

 यत्नाळ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अनुदान प्रकरणी कारवाईची मागणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे यत्नाळ येथील कै. व्यंकय्या कुसय्या गुत्तेदार सार्वजनिक वाचनालयाच्या अनुदान वितरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी वाचनालयाचे अध्यक्ष श्रीशैल सिद्रामय्या स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केली.
         सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाच्या बदल अर्जाबाबतचा वाद अद्याप सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असून कोणत्याही गटाचा बदल अर्ज मंजूर झालेला नाही. असे असतानाही संबंधित वाचनालयाला सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षांचे अनुदान वितरित करण्यात आले.
यासंदर्भात जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करण्यात आल्याचा दावा स्वामी यांनी केला. दि. २६ जून २०२४ रोजी स्वतः जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी बदल अर्ज मंजूर झाल्यानंतरच अनुदानाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे लेखी कळविले होते. मात्र त्यानंतरही अनुदान वितरित झाल्याने संशय निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
         सध्या वाचनालयाचे अध्यक्ष किंवा सदस्यही नसताना संबंधित माजी अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, होटगी स्टेशन शाखेतून सुमारे सहा लाख रुपयांचे अनुदान काढले. वाचनालयात वर्तमानपत्रे, पुरेशी पुस्तके, फर्निचर किंवा नियमित कर्मचारी नसतानाही दरवर्षी सकारात्मक तपासणी अहवाल दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील अनेक ग्रंथालये बंद अवस्थेत असतानाही अनुदानाचा लाभ घेत असल्याचे आरोप स्वामी यांनी केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बेकायदेशीरपणे उचललेले अनुदान वसूल करावे तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांसह दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वामी यांनी केली.

चौकट -१
वाचनालयाविरोधातील आरोप एकतर्फी व वस्तुस्थितीविरुद्ध आहेत. वाचनालयाचे सर्व कामकाज व आर्थिक व्यवहार नियमानुसार करण्यात आले आहेत. शासनाकडून अनुदानही संबंधित प्रशासकीय प्रक्रियेनंतरच मंजूर झाले आहे. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. चौकशीत सत्य समोर येईल, असा आम्हाला विश्वास असून संस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.
वाचनालयाच्या कार्यकारी मंडळासंदर्भातील वाद हा संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे प्रलंबित असला तरी संस्थेचे नियमित कामकाज, वाचनालय सेवा आणि शासकीय पत्रव्यवहार नियमांनुसार सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनुदान वितरणात कोणताही गैरव्यवहार झाल्याचा आरोप निराधार आहे. - वाचनालय चालक 

चौकट २
संस्थेविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी झाल्यास सत्य जनतेसमोर येईल, असा आम्हाला विश्वास आहे. चौकशी यंत्रणांना आम्ही पूर्ण सहकार्य करू. मात्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वी वाचनालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी अपेक्षा आहे. -विश्वस्त


यत्नाळसारख्या ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार करणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या विकासासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. वैयक्तिक वाद किंवा गटबाजीमुळे संस्थेच्या कार्यावर परिणाम होऊ नये, हेच आमचे मत आहे. - एक वाचक

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages