आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; कार्यालयात शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 17, 2026

आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; कार्यालयात शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली

आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; कार्यालयात शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : प्रलंबित मागण्या, पदोन्नतीतील दिरंगाई आणि नवीन आकृतीबंधाच्या अंमलबजावणीसह विविध प्रश्नांवर महाराष्ट्रातील सर्व ५६ प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सोलापूर व अकलूज येथील आरटीओ कर्मचारीही सहभागी झाल्याने दोन्ही कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

मंगळवारी (दि. १६) सकाळपासून कर्मचाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत आंदोलन सुरू केले. सोलापूर आरटीओ कार्यालयात २५ तर अकलूज कार्यालयात १५ कर्मचारी कार्यरत असून सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

या संपामुळे वाहन चालविण्याचे परवाने (लायसन्स), नवीन वाहनांची नोंदणी, वाहन परमिट, फिटनेस प्रमाणपत्रे आदी महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेकांची कामे प्रलंबित राहिली आहेत. संपाची अचानक घोषणा झाल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा संप पूर्णपणे रास्त असल्याचे सांगत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

चौकट

"आमच्या मागण्या रास्त; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा"

"पदोन्नती, नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, वाढीव पदे आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. या मागण्या केवळ कर्मचाऱ्यांपुरत्या मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेशी, मुलांच्या शिक्षणाशी आणि सेवासन्मानाशी संबंधित आहेत. आरटीओमधील लिपिक वर्ग हा विभागाचा कणा आहे. आमच्या संपामुळे सोलापुरातील संपूर्ण कामकाज ठप्प झाले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा."

मेहबूब मुजावर, जिल्हाध्यक्ष, आरटीओ कर्मचारी संघटना

मुख्य मागण्या

• सेवा प्रवेश नियम तातडीने जाहीर करावेत.
• मंजूर आकृतीबंधाची त्वरित अंमलबजावणी करावी.
• ५६ कर्मचाऱ्यांची मागे घेतलेली पदोन्नती पूर्ववत करावी.
• प्रशासकीय पदांवरील प्रलंबित बढत्या तत्काळ द्याव्यात.
• बढतीपूर्व घेण्यात येणारी नियमबाह्य परीक्षा रद्द करावी.
• १०-२०-३० कालबद्ध सेवांतर्गत लाभ लागू करावेत.
• कर्मचाऱ्यांच्या पदांचे नामकरण सुधारित करावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages