राजाभाऊ आलुरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

राजाभाऊ आलुरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित?

 राजाभाऊ आलुरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित?

सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलुरे हे लवकरच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी राजाभाऊ आलुरे यांनी आपल्या समर्थकांसह भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी राजकीय वाटचाल, सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आणि स्थानिक राजकीय समीकरणांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
राजाभाऊ आलुरे हे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार विजयकुमार देशमुख यांचे विश्वासू आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. शहराच्या पश्चिम भागात त्यांचा स्वतंत्र जनसंपर्क असून विविध सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, २०२६ च्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राजाभाऊ आलुरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. अत्यंत मर्यादित पक्षीय पाठबळ असतानाही त्यांनी सुमारे ५ हजार ३०० मते मिळवून आपली स्वतंत्र राजकीय ताकद सिद्ध केली होती. या मताधिक्यामुळे स्थानिक राजकारणात त्यांचे वजन वाढले असून विविध राजकीय पक्ष त्यांच्याकडे संभाव्य नेतृत्व म्हणून पाहत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राज्यभर संघटन विस्तारावर भर देत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवर जनाधार असलेल्या नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत राजाभाऊ आलूरे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी सोलापूर शहरात राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
आलुरे यांच्या प्रवेशामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः भाजप, शिवसेना आणि इतर स्थानिक राजकीय गटांमधील ताकदीचे संतुलन नव्याने निर्माण होऊ शकते. शहर उत्तर सोलापूर परिसरातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तथापि, राजाभाऊ आलुरे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी येत्या काही दिवसांत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात पुढील काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages